भारतामधील सामने खेळण्यास BCB चा नकार, मात्र खेळाडूंची इच्छा स्पष्ट
2026 च्या T20 विश्वचषकात बांगलादेशच्या सहभागाबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेदरम्यान, स्टार फलंदाज नजमुल हुसेन शांतो यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) भारतात सामने खेळण्यास नकार देत असला तरी खेळाडूंना आयसीसीच्या या प्रतिष्ठित स्पर्धेत नक्कीच सहभागी व्हायचे आहे.
नवी दिल्ली : 2026 च्या T20 विश्वचषकात बांगलादेश भारतात गट सामने खेळणार की नाही, यावर सध्या मोठा गोंधळ आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बांगलादेशचा स्टार फलंदाज नजमुल हुसेन शांतो यांनी माध्यमांशी संवाद साधताना खेळाडूंची भूमिका स्पष्ट केली.
शांतो म्हणाले की, क्रिकेट वेल्फेअर असोसिएशन ऑफ बांगलादेश (CWAB) मध्ये या विषयावर कोणतीही औपचारिक चर्चा झाली नसली, तरी विश्वचषक खेळण्याबाबत खेळाडूंमध्ये एकमत आहे.
“आम्हाला यावर बोलण्याची संधीच मिळाली नाही. आम्ही सामने खेळण्यात खूप व्यस्त होतो. शिवाय अलीकडे घडलेल्या काही घटनांचा खेळाडूंवर मानसिक परिणाम झाला. तो काळ खूप कठीण होता,” असे शांतो यांनी सांगितले.
विश्वचषकाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले,
“क्रिकेटपटू म्हणून आम्हाला नेहमीच खेळायचं असतं. आणि जेव्हा विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा असते, तेव्हा तिथे उपस्थित राहण्याची इच्छा नक्कीच असते. अशा संधी वारंवार मिळत नाहीत.”
अंतिम निर्णय आयसीसी आणि बोर्डाकडे असल्याचे मान्य करत शांतो म्हणाले,
“आत काय सुरू आहे याची मला कल्पना नाही, त्यामुळे भाष्य करणे कठीण आहे. पण खेळाडू म्हणून आम्हाला खेळायचंच आहे. प्रश्न सुटले तर, इंशाअल्लाह, विश्वचषकात खेळणे आमच्यासाठी खूप चांगले ठरेल.”
याआधी बांगलादेशचा T20 कर्णधार लिटन दास यानेही अशीच नाराजी व्यक्त केली होती. भारत दौऱ्याबाबत खेळाडूंशी कोणतीही चर्चा किंवा संमती घेतली नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते.
दरम्यान, बांगलादेशने सरकारच्या पाठिंब्याने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात गट सामने खेळण्यास नकार दिला असून, आयसीसीला हे सामने सह-यजमान श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली आहे. ढाका येथे झालेल्या आयसीसी-BCB चर्चांनंतरही तोडगा निघालेला नाही.
ESPNcricinfo च्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बांगलादेशच्या भूमिकेला पाठिंबा देत आयसीसीला पत्र पाठवले आहे. मात्र, आयसीसीने आतापर्यंत स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याची भूमिका कायम ठेवली आहे.
T20 विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, बांगलादेशचे चार गट सामने कोलकाता आणि मुंबई येथे नियोजित आहेत. बुधवारी होणारी आयसीसी बोर्ड बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.













