ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनातून पिकअप ट्रकच्या चाकांची चोरी; चार कॅब चालक अटकेत

10 लाखांची चाके-टायर चोरी, रांजणगाव पोलिसांची कारवाई

शिक्रापूर-शिरूर परिसरात महिन्यांपासून सुरू होती चोरी

ऑनलाइन गेमिंगमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी चार कॅब चालकांनी चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे उघड झाले आहे. या आरोपींनी पिकअप ट्रकची चाके आणि टायर चोरण्याचा सिरीयल प्रकार सुरू केला होता. काही महिन्यांत त्यांनी अनेक भागांतून मोठ्या प्रमाणावर चोरी केल्याचे तपासात समोर आले. मात्र, रांजणगाव पोलिसांनी सतर्क तपास करत या टोळीला अटक केली. चोरीचा मुद्देमाल विक्रीपूर्वीच जप्त करण्यात आल्याने मोठे नुकसान टळले आहे.


पुणे : ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कॅब ॲग्रीगेटर सेवेशी संलग्न असलेल्या चार चालकांनी तब्बल 14 पिकअप ट्रकची चाके आणि टायर चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या चोरीची एकूण किंमत सुमारे 10 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रांजणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही टोळी चोरीचा माल विक्री करण्यापूर्वीच अटक केली. आरोपींनी गेल्या काही महिन्यांत शिक्रापूर, शिरूर आणि रांजणगाव परिसरात चोरीच्या अनेक घटना केल्याची कबुली दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या चालकांची नावे अक्षय राठोड (28, रा. आव्हाळवाडी), तुषार दामेकर (23), करण राठोड (23) आणि सुनील भोसले (25, मूळ नांदेड जिल्हा, सध्या वाघोली) अशी आहेत. सर्व आरोपी कॅब चालक असून ते शहर आणि उपनगरात कार्यरत होते.

वाघमोडे यांनी प्रहार डिजिटलशी बोलताना सांगितले की, चोरीची सर्व चाके व टायर तसेच टायर्स वाहतुकीसाठी वापरलेली एक कार पोलिसांनी जप्त केली आहे. या जप्त मालाची एकूण किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे.

अधिक तपासात कारेगाव गावात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप ट्रकचे चार टायर चोरीला गेल्याची तक्रार नुकतीच दाखल झाली होती. याशिवाय शिक्रापूर आणि शिरूर भागातूनही अशाच स्वरूपाच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी उपनिरीक्षक अविनाश थोरात आणि त्यांच्या पथकाने ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामधून संशयित एका कारचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर वाघोली परिसरातून चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपींनी पिकअप ट्रकची चाके आणि टायर चोरल्याची कबुली दिली. त्यांना ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लागले होते. या सवयीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. गेमिंग सुरू ठेवण्यासाठी त्यांनी उधारीदेखील घेतली होती. नुकसान भरून काढण्यासाठीच त्यांनी चोरीचा मार्ग निवडल्याचे पोलिसांनी सांगितले.

बहुतांश पिकअप ट्रक रस्त्याच्या कडेला उभे असल्याने आरोपी त्यांनाच लक्ष्य करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहेत.