Ratnagiri Fire Update: तब्बल ४ तासांनी श्री महालक्ष्मी मिनी मॉल येथील आग आटोक्यात

रत्नागिरीत भाऊबीजेच्या पहाटे महालक्ष्मी मिनी मॉलला भीषण आग; कोट्यवधीचे नुकसान

नगर परिषद, फिनोलेक्स आणि MIDC च्या बंबांच्या मदतीने चार तासांनंतर आटोक्यात, कोट्यवधींचे नुकसान

रत्नागिरी: अनघा निकम मगदूम
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील के. सी. जैन नगर येथे आज भाऊबीजेच्या दिवशी पहाटे ५:१५ वाजण्याच्या सुमारास ‘श्री महालक्ष्मी मिनी मॉल’ला अचानक भीषण आग लागली. भाऊबीजेचा सण आणि मोठी उलाढाल होईल या अपेक्षेने मॉलमधील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नवीन साहित्याचा साठा भरला होता. मात्र, अचानक लागलेल्या या आगीने अत्यंत रौद्र रूप धारण केले. नगर परिषद, फिनोलेक्स आणि MIDC यांच्या अग्निशामक बंब आणि यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन युद्धपातळीवर प्रयत्न केल्यानंतर चार तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने रत्नागिरीत शोककळा पसरली आहे.

पहाटे ५ वाजता आग भडकली, धुराचे दूरवर लोट

आज भाऊबीजेचा सवदिवस असल्याने मोठी खरेदी होईल या अपेक्षेने मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन साहित्याचा व मालाचा साठा भरण्यात आला होता. मात्र, पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या या आगीने अवघ्या काही वेळातच संपूर्ण इमारतीला आपल्या विळक्यात घेतले. मॉलमधील कापड, प्लास्टिक आणि इतर ज्वलनशील साहित्यामुळे आग सातत्याने भडकत राहिली. आगीच्या प्रचंड ज्वाला आणि काळ्याकुट्ट धुराचे लोट कित्येक दूरपर्यंत दिसत होते, ज्यामुळे परिसरामध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली होती.

अग्निशामक बंब आणि जवानांचे अंगावर काटा आणणारे धाडस

आगीची भीषणता पाहता रत्नागिरी नगरपरिषद, फिनोलेक्स, एमआयडीसी तसेच लगतच्या परिसरासून नगर परिषद, फिनोलेक्स आणि MIDC यांच्या अग्निशामक बंब घटनास्थळी बोलावण्यात आले. आग विझवण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागला, मात्र पाण्याचा तुटवडा आणि अपुऱ्या साधनसामग्रीमुळे आग विझवताना जवानांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. पालिकेच्या आणि इतर सर्व अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून ही आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्यापासून रोखली. या अत्यंतिक धाडसी

प्रयत्नांदरम्यान काही जवानांना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे, परंतु त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला.

कोट्यवधींचे नुकसान, मालकांसह व्यापारीवर्ग हवालदिल
ही दुर्दैवी घटना पहाटेच्या वेळी घडल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, श्री महालक्ष्मी मिनी मॉलचे प्रमुख मयुरेश खानविलकर आणि नितीन लाखण यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मॉल मधील संपूर्ण माल, फर्निचर आणि आतील इतर साहित्य जळून खाक झाल्यामुळे त्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसंच या केसीजी नगरमध्ये छोटी-मोठी ऑफिसेस आणि दुकाने असणारे इतर मालकही धास्तावून या ठिकाणी आलेले पाहायला मिळाले.

‘दैनिक सागर’चे कार्यालय सुरक्षित, पोलिसांचा चोख बंदोबस्त
ज्या इमारतीत हे मिनी मॉल आहे, त्याच परिसरामध्ये सगळ्यात वरच्या मजल्यावर ‘दैनिक सागर’चे कार्यालय देखील आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या कार्यालयाचे फारसे मोठे नुकसान झालेले नाही. तसेच परिसरात कोणतीही अफवा किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्था चोखपणे पार पाडली. स्थानिक नागरिकांनीही मोठी एकजूट दाखवत मदतीसाठी धाव घेतली.

आमदार किरण सामंत यांच्याकडून पाहणी व सांत्वन

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मॉलचे प्रमुख मयुरेश खानविलकर, नितीन लखन आणि त्यांचे कुटुंबीय आणि इतर सहकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले तसेच कोणतीही मदत लागली तर ती तात्काळ केली जाईल, असे आश्वसन दिले. तसेच त्यांनी ‘दैनिक सागर’च्या प्रमुख श्रीमती शुभदा जोशी तसेच रत्नागिरी प्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्याशीही संपर्क साधून सद्यस्थितीचा आढावा घेतला. तब्बल चार तास सुरू असलेलं हे आगीचं तांडव अखेर नियंत्रणात घेण्यात यश आलं असून, या दुर्घटनेने रत्नागिरीकर हळहळ व्यक्त करत आहेत.