वेंगुर्लेत जि. प. व पं. स. च्या १५ ही जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार : मनीष दळवी

वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच जागांपैकी तीन जागा भाजपाला आणि दोन जागा शिवसेनेला तर पंचायत समितीच्या दहा जागांपैकी दोन्ही पक्षांना पाच पाच जागा महायुतीमधून जाहीर झाल्या आहेत. यापैकी एक जागा अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला देण्याबाबत अंतिम टप्प्यात चर्चा सुरू आहे, मात्र १५ ही जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज महायुतीचे उमेदवारी अर्ज दाखल करताना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज २१ जानेवारी रोजी शेवटचा दिवस आहे. सुमारे १८० उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडून वितरित झाले आहेत. तर काल पर्यंत केवळ दोनच उमेदवारी अर्ज दाखल आहेत. सर्वच मतदारसंघात उमेदवारीसाठी उमेदवारांची गर्दी आहे. त्यामुळे सर्वच पक्ष इच्छुक उमेदवारांबरोबर बोलण्यात आणि त्यांची समजूत घालण्यात व्यस्त आहेत. मात्र इच्छुक सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज निवडणूक कक्षात गर्दी केली आहे.

दरम्यान महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मनीष दळवी यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुका अध्यक्ष पप्पू परब, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, मनवेल फर्नांडिस तसेच नगरसेवक भाजपा व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीचे नेते खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या जागांचे वाटप झालेले आहे. त्यानुसार महायुती तर्फे उमेदवार जाहीर केले असून त्यांची आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

*वेंगुर्लेसह सिंधुदुर्ग जि. प. व पं.स.वर महायुतीचाच झेंडा फडकणार : सचिन वालावलकर*

वेंगुर्लेसह सिंधुदुर्ग जि. प. व पं.स.वर महायुतीचाच झेंडा फडकणार असा विश्वास यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी व्यक्त केला. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, निलेश राणे या नेत्यांच्या निर्णयानुसार सिंधुदुर्गात ही निवडणूक महायुती म्हणून लढली जात आहे. त्यानुसार दोन्हीकडून उमेदवार देण्यात आले आहे. एकूणच वातावरण पाहता वेंगुर्ले मध्ये जिल्हा परिषद पाच आणि पंचायत समितीच्या दहा जागांसह सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकेल असा विश्वास आहे असे त्यांनी सांगितले.