जीआयटी – AICTE व्याख्यानमालेत सीमेन्स तज्ज्ञांकडून ऑटोमेशन व रोबोटिक्सवर सखोल मार्गदर्शन

खेड (प्रतिनिधी) :– घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) अंतर्गत AICTE डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर व्याख्यानमाला शृंखलेचे आयोजन करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रात झपाट्याने होत असलेले तांत्रिक बदल, इंडस्ट्री 4.0 तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या नव्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना अद्ययावत माहिती व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने AICTE च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिनांक १७ जानेवारी रोजी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामार्फत “Industry 4.0, Automation and Robotics” या विषयावर एकदिवसीय व्याख्यान व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले.
AICTE ने संकल्पित केलेली ही आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित व्याख्यानमाला वर्षभर चालणार असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना औद्योगिक क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या व्याख्यानासाठी ऑटोमेशन क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच AICTE डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर श्री. महेंद्र काणे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. श्री. काणे सध्या सीमेन्स ऑटोमेशन कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्री. काणे यांनी इंडस्ट्री 4.0, ऑटोमेशन व रोबोटिक्स या संकल्पनांचा सविस्तर उलगडा केला. औद्योगिक क्षेत्रात को-बोट म्हणजेच कोलॅबोरेटिव्ह रोबोट्स कशा पद्धतीने मानवासोबत काम करतात, त्यांचा उत्पादनक्षमतेवर कसा सकारात्मक परिणाम होतो, याची उदाहरणांसह माहिती त्यांनी दिली. भविष्यात औद्योगिक ऑटोमेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पीएलसी प्रणालीमध्ये समावेश होणार असून, त्यामुळे उद्योगविश्वात व्यापक बदल घडून येतील, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी डिजिटल ट्विन्स या नव्या आणि महत्त्वाच्या संकल्पनेवरही प्रकाश टाकला. आरोग्य, ऑटोमोबाईल तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात डिजिटल ट्विन्स तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता, अचूकता आणि सुरक्षिततेत लक्षणीय वाढ होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. या व्याख्यान व चर्चा सत्रात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध प्रश्नांद्वारे संवाद साधला.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. सचिन खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंडस्ट्री 4.0 व रोबोटिक्स क्षेत्रातील संधींचा इंटर्नशिपच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी शिक्षण अधिक प्रभावी होऊन रोजगाराच्या संधी निश्चितच वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. पंकज वरक व डॉ. श्रीशैल मुचंडे यांनी केले.