कराड येथे बो माऊथ गिटार मास्याची शिकार

कराड परिसरात बो माऊथ गिटार (Bowmouth Guitarfish) या दुर्मिळ माशाची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा मासा वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत शेड्यूल-१, भाग E मध्ये समाविष्ट असून त्याला पूर्ण संरक्षण आहे. तसेच आय.यू.सी.एन. या आंतरराष्ट्रीय संस्थेने या माशाला गंभीरपणे धोक्यात असलेली प्रजाती घोषित करून रेड डेटा लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे.

कराड येथील अमीर दस्तगीर नदाफ, रा. मलकापूर, कराड आणि सातारा येथील ओमकार राजेंद्र मेळवणे, रा. गुरुवार पेठ, सातारा यांनी या माशाचा व्हिडीओ प्रसारित करून त्याचे प्रदर्शन केल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे संबंधित आरोपींविरोधात वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

बो माऊथ गिटार मासा कसा आहे?

बो माऊथ गिटार मासा ही समुद्रात आढळणारी अत्यंत दुर्मिळ आणि संवेदनशील जात आहे. हा मासा दिसायला शार्क आणि रे माशांच्या मिश्र स्वरूपासारखा असून त्याचे तोंड रुंद आणि शरीर चपटे असते. तो प्रामुख्याने समुद्राच्या उथळ भागात, वाळू किंवा चिखलाच्या तळाशी राहतो. लहान मासे, खेकडे आणि शंखशिंपले हे त्याचे मुख्य अन्न आहे. अतिमासेमारी, अधिवास नष्ट होणे आणि बेकायदेशीर शिकार यामुळे या माशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळेच या जातीला कायद्याने विशेष संरक्षण देण्यात आले आहे.

ही कारवाई मा. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, वनपाल सुनिल शिंदे, वनरक्षक कैलास सानप, वनरक्षक अभिजीत शेळके, वनरक्षक अक्षय पाटील आणि वनरक्षक मुकेश राऊळकर सहभागी होते.