बांदा चेकपोस्टवर दारुसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा पोलिसांची कारवाई 

बांदा : प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने अवैध दारू वाहतुकीविरोधात जोरदार मोहीम सुरू असतानाच बांदा चेकपोस्टवर इनोव्हा कारमधून होणारी गोवा बनावटीच्या दारूची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे. बांदा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत एकूण १२ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री बांदा चेकपोस्ट येथे संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू होती. यावेळी पोलिसांना इनोव्हा क्रिस्टा कारची (क्रमांक MH 12 SF 1056) संशयास्पद हालचाल दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून झडती घेतली असता त्यात बेकायदेशीर वाहतूक केली जाणारी गोवा बनावटीची विदेशी दारू आढळून आली.

 

याप्रकरणी शुभम मुरलीधर बिरादार (२७, रा. जमखंडी, जि. बिदर, कर्नाटक) आणि अजय विनायक सांगळे (२६, रा. आरवली, ता. वेंगुर्ला) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.कारवाई दरम्यान पोलिसांनी कारसह वेगवेगळ्या ब्रँडच्या दारूचे एकूण २० बॉक्स जप्त करण्यात आलेत.

 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, एएसआय नाईक, हेड कॉन्स्टेबल कांडरकर, हेड कॉन्स्टेबल परब, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद पाटील आणि राजाराम कापसे यांच्या पथकाने केली.