पाच दिवस भरगच्च कार्यक्रम
विजयदुर्ग (प्रतिनिधी) : विजयदुर्ग येथील विठ्ठलवाडी मित्रमंडळाच्या मागे गणेशोत्सवाला गुरुवार दि. २२ जानेवारीपासून सुरुवात होत असून हा महोत्सव २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या दरम्यान धार्मिक, क्रीडा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ तारखेला गणेश मूर्तीचे आगमन, प्राणप्रतिष्ठापना याचबरोबर सायंकाळी चार वाजल्यापासून स्थानिक भजनी बुवांची सुश्राव्य भजने आयोजित केलेली आहेत. रात्री ८ वाजता दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २३ तारखेला रात्री दहा वाजता स्थानिक कलाकारांचे कपल डान्स, कराओके गाणी महेश बिड्ये यांचा खास आकर्षण असलेला कार्यक्रम संत गोरा कुंभार तसेच विनोदी स्किट कार्यक्रम होणार आहेत.
२४ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता कुपन योजना सोडत, रात्री १० वाजता विघ्नहर्ता आईस्क्रीम पार्लर (प्रोप्रा. राधिका शंकर सागवेकर) आयोजित विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये मर्यादित भव्य सोलो डान्स आणि ग्रुप डान्स स्पर्धा आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल. २५ तारखेला दुपारी दोन वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी तीन वाजल्यापासून महिलांसाठी हळदीकुंकू आणि रात्री विघ्नहर्ता आईस्क्रीम पार्लर प्रायोजित विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये मर्यादित महिलांसाठी भव्य होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम विजेत्या महिलेला दहा हजाराची पैठणी आणि पंधरा हजाराची नथ, याचबरोबर द्वितीय विजेत्या महिलेला गॅस शेगडी, तृतीय विजेत्याला मिक्सर याचबरोबर अंतिम स्पर्धेत आलेल्या १२ स्पर्धकांना दोन हजाराची साडी याचबरोबर प्रेक्षकांसाठी सुद्धा कुपन सिस्टीम अंतर्गत वीस बक्षीस दिली जाणार आहेत. २६ तारखेला या गणेशोत्सवाची सांगता होईल. सायंकाळी ४ वाजता श्रींची गणेश विसर्जन मिरवणूक निघेल. दरम्यान, रोज सकाळी आरती, दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत अभिषेक, दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद होईल. या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विठ्ठलवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय सावंत तसेच सचिव दिनेश जावकर यांनी केले आहे.











