वेंगुर्ले मध्ये जि. प. च्या ५ जागांसाठी ३७ तर पं. स. च्या १० जागांसाठी ६२ उमेदवारी अर्ज दाखल..

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांची गर्दी

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी आणि पंचायत समितीच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. महायुतीतर्फे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी ३७ तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी ६२ असे एकूण ९९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये बऱ्याच ठिकाणी नाराज पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. उद्या गुरुवार २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली.

वेंगुर्ले तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उमेदवार आणि कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली. तालुक्यात दाखल झालेल्या जिल्हा परिषद मतदार संघ उमेदवारांची संख्या ३७ आहे. यामध्ये म्हापण : ६, आडेली : १३, तुळस : ६, उभादांडा : ३ आणि रेडी जिल्हा परिषद मतदार संघात एकूण ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
तर दहा पंचायत समिती मतदार संघात उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या ६२ आहे. यामध्ये म्हापण : ११, परुळे : ९, आडेली : १०, वायंगणी : ७, तुळस : ४, मातोंड : ८, उभादांडा : २, आसोली : ४, रेडी : ३ आणि शिरोडा मतदार संघात ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.