कोकिसरे पं. स. उमेदवार साधना सुधीर नकाशे बिनविरोध
भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
वैभववाडी प्रतिनिधी
कोकिसरे पंचायत समिती मतदार संघातून केवळ भारतीय जनता पक्षाकडूनच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने भाजपाच्या अधिकृत उमेदवार साधना सुधीर नकाशे यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वैभववाडीतील भाजपाने विजयाचे खाते उघडताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे वैभववाडी पंचायत समितीच्या आवारात विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
कोकिसरे मतदार संघातून भाजपा उमेदवार साधना सुधीर नकाशे यांनी दोन अर्ज दाखल केले, तर अक्षता सूर्यकांत डाफळे यांनी भाजपाकडून डमी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून उबाठा, मनसे व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून कोणताही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
यामुळे साधना सुधीर नकाशे यांचे जवळपास बिनविरोध होणे निश्चित झाले असून भाजपाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.










