देवगड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, विविध राजकीय काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर छाननी प्रक्रिया झाली , या प्रक्रियेत शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील एक अर्ज बाद ठरवण्यात आला आहे.
देवगड तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी पुरळ, पडेल, बापर्डे, पोंभुर्ले, शिरगाव, किंजवडे आणि कुणकेश्वर या मतदारसंघांत भाजप, शिवसेना (उबाठा), काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना तसेच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विशेषतः अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिरगाव मतदारसंघात मोठ्या संख्येने उमेदवार उभे राहिल्याने येथे चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत. पंचायत समिती निवडणुकीसाठीही तालुक्यातील विविध मतदारसंघांत उमेदवारांची गर्दी असून निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
दरम्यान, शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून सादर झालेल्या एकूण 64 उमेदवारी अर्जांपैकी एक अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून समीर भगवान शिरगावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, एकाच सूचकाने दोन वेगवेगळ्या उमेदवारांच्या अर्जांवर सही केल्याचे आढळून आल्याने नियमांनुसार हा अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आर. जे. पवार यांनी सांगितले की, संबंधित सूचकाने ज्या उमेदवाराच्या अर्जावर प्रथम सही करून अर्ज सादर केला होता तो अर्ज वैध मानण्यात आला आहे. त्यानंतर त्याच सूचकाने समीर भगवान शिरगावकर यांच्या अर्जावर सही केल्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक रिंगणातून एक अपक्ष उमेदवार बाहेर पडला असून, उर्वरित उमेदवारांमधील लढत आणखी रंगण्याची शक्यता आहे. देवगड तालुक्यातील या निवडणुका राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जात असून, पुढील काही दिवसांत प्रचाराला अधिक वेग येणार आहे.











