Breaking: दापोली बाजारपेठेत भीषण आग; बिपिन कॉर्नर दुकान जळून खाक

दापोली (विशेष प्रतिनिधी) – 

दापोली शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये आज उशिरा रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. हॉटेल सन्मान समोरील बिपिन कॉर्नर येथील बिपिन मार्ट या दुकानाला अचानक आग लागली आणि काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, दापोली शहरात अग्निशामक बंब उपलब्ध नसल्यामुळे आग विझवण्यात मोठा विलंब झाला. परिणामी, आगीचा फैलाव वाढत गेला आणि दुकान पूर्णतः भस्मसात झाले.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खेड नगर परिषदेचे अग्निशामक दल तातडीने दापोलीकडे रवाना करण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

झपाट्याने विकसित होत असलेल्या दापोली शहरात अग्निशामक यंत्रणेचा अभाव असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्य बाजारपेठेत अशा प्रकारच्या घटना घडल्यास अनेक दुकानांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.