मालवण (प्रतिनिधी) : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मालवण यांच्या वतीने कट्टा येथे आयोजित ‘कृषी महोत्सव २०२६’ मधील वैशिष्ट्यपूर्ण कृषी उत्पादन प्रदर्शनात शेतकरी मंगेश माणगावकर यांनी सादर केलेल्या ५.१३८ किलोग्रॅम वजनाच्या महाकाय नारळाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या अनोख्या नारळाची आणि त्याच्या मातृवृक्षाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी तसेच ठाणे आणि मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच मंगेश माणगावकर यांच्या बागेला सदिच्छा भेट दिली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत पार पडलेल्या या प्रदर्शनात ५.१३८ किलो वजनाचा हा नारळ विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. या नारळाची उत्पत्ती, त्याची विशेष जनुकीय वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची निगा आणि बागेतील एकात्मिक खत व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयांवर या पाहणी दौऱ्यादरम्यान उपस्थितांमध्ये सखोल चर्चा झाली. प्रगतशील शेती आणि उत्तम व्यवस्थापनामुळे अशा प्रकारचे दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाल्याचे मत अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.
या विशेष पाहणी प्रसंगी वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक, मालवणचे उप कृषी अधिकारी श्री. धनंजय गावडे, बांदा येथील उप कृषी अधिकारी श्री. एस. ए. सरगुरू, ठाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ उद्यान अधीक्षक श्री. केदार पाटील तसेच ‘शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. शिवप्रसाद देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी माणगावकर यांच्या प्रयोगशील शेतीचे कौतुक केले असून, या मातृवृक्षाच्या संवर्धनाबाबत मोलाचे मार्गदर्शनही केले.













