प्रतिनिधी/रोहन कांबळे
कोल्हापूर : महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे नूतन नगरसेवक अभिजीत खतकर यांची भुदरगड तालुक्यातील करडवाडी गावातील ग्रामस्थांनी फटाक्याची आतिषबाजी घुमक्याच्या निनादात गावातून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी महिलांनी आपापल्या दरात औक्षण केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातून कोल्हापूर शहराकडे वाटचाल करत नागरिकांच्या हाकेला धावून समाजसेवा करत
राजकारणात सक्रिय होत नगरसेवकपदापर्यंत मजल मारणे ही गोष्ट केवळ वैयक्तिक यशाची नसून आपल्या गावासाठी अभिमानास्पद ठरते असे मत माजी सरपंच विलास बेलेकर व्यक्त केले तर खेड्यातील साध्या परिस्थितीतून शिक्षण, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर शहराच्या राजकारणात स्थान मिळवणारे नेतृत्व हे अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत प्रकाश बेलेकर यांनी नूतन नगरसेवक अभिजीत खतकर यांच्या मिरवणूक दरम्यान सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले.
ग्रामीण भागातील समस्यांची जाण असलेले नूतन नगरसेवक अभिजीत खतकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माझ्या विजयामध्ये सिंहाचा वाटा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेच के.डी.सी .सी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर या दोन बंधूंचा असून त्यांच्या परिश्रमाचे हे यश माझ्या पदरात पडले आहे. भविष्यात त्यांच्यामुळेच मला एखादे चांगले पद मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी राहून त्यांना ताकद देऊया असे ते म्हणाले.
अभिजीत खतकर यांनी गावाशी नाळ कायम ठेवत समाजसेवेतून राजकारणात पुढे जाणे ही कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण भागातून शहरात जाऊन नगरसेवक होणे म्हणजे केवळ पद मिळवणे नसून, आपल्या गावाचे नाव उज्वल करणे आणि विकासाची दारे उघडणे होय, असे मत सरपंच विनोद कांबळे यांनी व्यक्त केले .












