छ. शिवरायांचा इतिहास आणि हिंदवी स्वराज्याची प्रेरणा बालमनात रुजविण्याचा उपक्रम
चिपळूण (प्रतिनिधी) : दिवाळीच्या सुट्टीत ऐतिहासिक किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारून आपली सृजनशीलता आणि इतिहासप्रेम जपणाऱ्या बालगोपाळांचा कौतुक सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिपळूण येथील खंड शाखेतर्फे उत्साहात संपन्न झाला. बालवयातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास, गडकिल्ल्यांचे महत्त्व आणि हिंदवी स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमांना प्रमुख अतिथी प्रकाश गांधी गुरुजी, अशोकराव घेवडेकर, सुहास चव्हाण, कैसर देसाई, तृप्ती कदम आणि समीर कोवळे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. अमित पाटणकर यांनी प्रास्ताविकात दिवाळीच्या सुट्टीत चिपळूण शहरातील विविध भागांमध्ये मुलांनी कल्पकतेने किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्याचे सांगितले. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शाखेतर्फे दरवर्षी हा कौतुक सोहळा आयोजित केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निसर्ग व पर्यटन अभ्यासक समीर कोवळे यांनी किल्ल्यांचा इतिहास, त्यांची रचना आणि प्रतिकृती तयार करण्यामागील उद्देश याविषयी मार्गदर्शन केले. तसेच किल्ले अभ्यास आणि निसर्गभ्रमंती मोहिमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
अशोक घेवडेकर यांनी अभ्यासाबरोबर मैदानी खेळ आणि ऐतिहासिक छंद जोपासण्याचे महत्त्व सांगितले. कैसर देसाई यांनी मुलांच्या कल्पकतेला पालकांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. तृप्ती कदम यांनी किल्ले प्रतिकृती तयार करण्यात मुलींचाही वाढता सहभाग कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. सुहास चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध निवेदक प्रकाश गांधी गुरुजी यांनी मुलांनी इतिहासविषयक पुस्तके वाचून ज्ञान वाढवावे, असे आवाहन केले. किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारताना माती, दगड, विटा यांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या मूर्तींद्वारे इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न म्हणजे राष्ट्रप्रेमाची सुंदर अभिव्यक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहभागी बालगोपाळांनी आपल्या किल्ल्यांची माहिती आणि निर्मितीमागील संकल्पना विशद केली. सर्व सहभागी मुलांना व पालकांना दिवाळी फराळ, कोकणातील सात जिल्ह्यांतील किल्ल्यांची माहिती देणारे पत्रक आणि पेन भेट देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला नगरसेवक अजय भालेकर, रुमा देवळेकर, मानसी देशमाने, भरत भोसले, शेखर सावले, पद्माकर डांगे, वसुंधरा पाटील, अॅड. कीर्ती भागवत, इतिहास अभ्यासक मार्तंड माजलेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बापू काणे यांनी तर संतोष चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रसाद केतकर, स्नेहल पालकर, प्रणिता कपडेकर यांच्यासह संघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. बालगोपाळांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देतानाच ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव नव्या पिढीत रुजविणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.













