तातडीने कामाला सुरुवात करण्याची मागणी
चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा हायवेमुळे पाग बौध्द कॉलनी येथील नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबाबत पालकमंत्री उदय सामंत यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले. याठिकाणी रस्ता ओलांडणे कठीण बनले आहे. विशेषता वयोवृद्ध, विद्यार्थी व महिला वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी तातडीने याठिकाणी पादचारी भुयारी मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर चिपळूण प्रांत कार्यालय ते कापसाळ विश्रामगृह या सुमारे एक किलोमीटरच्या अंतरात उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या चिपळूण शाखा क्रमांक १ च्या वतीने करण्यात आली आहे. याचवेळी उड्डाण पुलाच्या जोड रस्त्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भराव करण्यात येत आहे. मात्र या कामामुळे पाग बौद्ध कॉलनीतील नागरिकांना रस्ता ओलांडणे कठीण बनले आहे. त्याशिवाय उर्वरित उड्डाणपुलाचे काम अजून काही वर्ष होणे शक्य नसल्याने या ठिकाणी पादचारी नागरिकांसाठी रत्नागिरी निवळीच्या पार्श्वभूमीवर भुयारी मार्ग ठेवण्यात यावा, अशी मागणी या महिलांनी केली आहे.
याबाबत माजी नगरसेविका उज्वला जाधव यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहराच्या हद्दीपासून कापसाळ विश्रामगृहापर्यंत सुमारे तीन किलोमीटरचे अंतर आहे. यापैकी दोन किलोमीटर अंतरात उड्डाणपूल झाला असून, प्रांत कार्यालय ते कापसाळ विश्रामगृह या उर्वरित एक किलोमीटरच्या टप्प्यात अद्याप उड्डाणपूल झालेला नाही. त्यामुळे या परिसरातील हजारो नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या महामार्गालगत महाविद्यालये, हायस्कूल, मराठी शाळा, जिल्हा न्यायालय, पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, सिटी सर्व्हे कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय आणि एस्टी महामंडळाची सुविधा असल्याने या मार्गावर नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन प्रांत कार्यालय ते कापसाळ विश्रामगृहापर्यंत उड्डाणपूल उभारण्याबाबत पालकमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यावेळी रत्नागिरी निवळीच्या धर्तीवर पाग बौद्ध कॉलनी येथे सुरू असलेल्या भरावाच्या ठिकाणी पादचारी भुयारी मार्ग तातडीने तयार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषतः विद्यार्थी व मोलमजुरी करणाऱ्या महिला वर्गाची मोठी गैरसोय महामार्गाच्या अडथळ्यामुळे होत आहे. त्यावर तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी आहे.
यावेळी उज्वला जाधव, मंदाकिनी मोहिते, राजेश्री जाधव, भारती सकपाळ, निधी जाधव, सूनिता जाधव, दिप्ती कदम, पर्वा जाधव, राखी जाधव, निकिता जाधव, प्रिती मोहिते, प्रतिभा सकपाळ, स्नेहा गमरे, प्रतिक्षा तांबे, उमा कदम, निलम गायकवाड, अनिता मोहिते, ललिता मोहिते, स्मिता जाधव यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, राजू जाधव, डॉ. अशोक सकपाळ, प्रशांत मोहिते, राजेंद्र जाधव, तुळशीराम जाधव, विलास सकपाळ, विलास जाधव, आदी उपस्थित होते.













