रत्नागिरी | प्रतिनिधी : मागील पाच-सहा दिवसात महापूर व अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात विद्युत यंत्रणेचे नुकसान होऊन काही ठिकाणी वीजपुरवठा बाधित झाला आहे. महावितरण यंत्रणेकडून बाधित वीज पुरवठा सुरू करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे व झाडांच्या फांद्या वीज वाहिनीवर तुटून पडल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी ३७ वीज खांब उन्मळून पडलेले आहेत. त्यामुळे १९ गावातील ९६ ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित आहे. त्यात संगमेश्वर उपविभागातील धामणी सोनारवाडी गावातील ४४ ग्राहक, राजापूर उपविभागागील गोठीवरे गावातील १० ग्राहकांचा समावेश आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी बाधित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण यंत्रणा कार्यक्षेत्रात अविश्रांत परिश्रम घेते आहे. तरी नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन आहे.











