गाळ उपशामुळे राजापुरातील पुराचा धोका काही प्रमाणात कमी झाला

 

पालकमंत्र्यांचे राजापूरवासीयांच्या वतीने हनिफ काझी यांनी मानले आभार

राजापूर | प्रतिनिधी : शहरातील कोदवली नदीपात्रातील गाळ उपशासाठी नगर परिषद, महसूल प्रशासन, नाम फाऊंडेशन आणि मोठया प्रमाणावर मिळालेला लोकसहभाग यामुळे हे काम मार्गी लागले आहे. तर अर्जुना नदीपात्रातील गाळ उपशासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी 75 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याने या नदीतील गाळ काही प्रमाणात उपसल्यामुळे राजापुरातील पुर काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे ना. सामंत यांचे यासाठी राजापूरवासीयांच्या वतीने माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी विशेष आभार मानले आहेत.

मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी घेतलेला पुढाकार त्याला महसूल प्रशासन, नाम फाऊंडेश आणि राजापूरवासीय व विविध सामाजिक संस्थांची मिळालेली साथ यामुळे राजापुरातील कोदवली नदी व कोदवली धरणातील गाळ उपसण्याचे मोठे काम झाले आहे.

मात्र अर्जुनेतील गाळ उपसा झाल्यास पुराचा धोका आणखी कमी होईल अशी चर्चा त्यावेळी झाली व यासाठी आपण स्वता, संजय ओगले, सौरभ खडपे यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला. मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी देखील यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून दिला. त्यानंतर पालकमंत्री ना. सामंत यांनी जलसंपदा विभागाच्या वतीने सदरचा गाळ काढण्याचे नियोजन करून प्रारंभी 25 लाख व त्यानंतर 50 लाख असा एकूण 50 लाखाचा निधी राजापुरातील अर्जुनेचा गाळ उपसण्यासाठी दिला. त्यामुळे यासाठी त्यांचे योगदान मोठे असून आज या दोंन्ही नद्यांतील गाळ काढण्यात आल्याने काही प्रमाणात का होईना राजापुरातील पुराचा धोका कमी झाल्याचे काझी यांनी नमुद केले. यासाठी राजापूरवासीयांच्या वतीने काझी, ओगले व खडपे यांनी पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहे.

गाळ उपशामुळे किती प्रमाणात पुराचा धोका कमी झाला याचे तांत्रिक मुद्यांवर संबधित विभागांकडून नक्कीच परिक्षण होईल, मात्र काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला हे मान्य करावे लागेल. मात्र भविष्यात या दोन्ही नद्यांमधील जास्तीत गाळ काढून तो नदीपात्रांबाहेर काढून राजापूर शहरातील पुराचे संकट कायमचे कसे दूर करता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी पालकमंत्री ना. सामंत यांच्याकडून आवश्यक तो निधी आंम्ही आणणार असल्याचे काझी यांनी सांगितले.