मतदार नोदणी अभियानासाठी कार्यक्रमासाठी सहकार्य करावे- प्रांताधिकारी वैशाली माने यांचे आवाहन

 

राजापूर | प्रतिनिधी : मुख्य निवडणुक आयोगाने मतदार नोंदणीचे उद्दीष्ट शंभर टक्के पुर्ण करण्यासाठी दिनांक २१ जुलै २०२३ ते दिनांक २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी अधिकारी हा उपक्रम सुरु केला आहे. राजापूर तालुक्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन कटीबध्द असुन राजकीय पक्षांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी श्रीमती वैशाली माने यांनी केले आहे .

राजापूरच्या प्रांताधिकारी श्रीमती वैशाली माने यांच्या अध्यक्षतेखाली प्रांत कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला राजापूरच्या तहसीलदार श्रीमती शीतल जाधव, नायब तहसीलदार दीपक कुळये,भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, उ. बा. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, माजी नगराध्यक्ष ॲड जमीर खलिफे, शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक भरत लाड, उ. बा. ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख रामचंद्र सरवणकर यासह पत्रकार उपस्थीत होते.

लोकसभेची सार्वत्रिक निवडणुक पुढील वर्षी होत आहे त्या पार्श्वभुमीवर निवडणुक आयोगाने मतदान नोंदणीवर जोरदार भर दिला आहे मतदान नोंदणीचे उद्दीष्ट शंभर टक्के पुर्ण करण्यासाठी घरोघरी अधिकारी हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे त्याबाबत प्रांताधिकारी श्रीमती माने यांनी माहिती दिली दि २१ जुलै ते दिनांक २१ ऑगस्ट २०२३ या दरम्यान या उपक्रमांतर्गत हे अधिकारी घरोघरी जाणार आहेत .या उपक्रमादरम्यान मतदारांची नोंदणी केली जाणार आहे. यामध्ये दिनांक १ जानेवारी २०२३ मध्ये ज्या मतदारांची वयाची अठरा वर्षे पुर्ण झाली आहेत मात्र त्यांची नोंदणी केलेली नाही अशा मतदारांची नोंदणी केली जाईल .स्थलांतरीत असलेले मतदार दोन ठिकाणी नावनोंदणी असलेले मतदार याबाबत बीएलओ यांच्याशी संपर्क साधुन त्यांना माहिती द्यावी असे आवाहन प्रांताधिकारी श्रीमती माने यांनी केले. याव्यतिरीक्त मृत मतदारांची नावे कमी करणे.यासह मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरण करणे आदी बाबींची पुर्तता या दरम्यान केली जाणार आहे. एखाद्या मतदान केंद्राबाबत ज्या अडचणी किंवा तक्रारी असतील,एखादी मतदान केंद्राची इमारत नादुरुस्त असेल आणि त्या ऐवजी दुसरी जागा केंद्रासाठी सुचवायची असेल त्यासाठी दिनांक २२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर या दरम्यान कार्यक्रम राबविला जाणार आहे.त्यानंतर अंतिम मतदार यादी तयार होणार आहे .
निवडणुक आयोगाचा हा उपक्रम राजापूर मध्ये शंभर टक्के राबविला जाईल त्यासाठी प्रशासन कटीबध्द आहे असे प्रांताधिकारी श्रीमती माने यांनी स्पष्ट केले या उपक्रमाला सर्व राजकीय पक्षांसह जनतेने सहकार्य करावे आणि निवडणुक आयोगाचे अभियान यशस्वी करावे. असे आवाहन प्रांताधिकारी श्रीमती माने यांनी केले आहे.