मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
राजापूर | प्रतिनिधी : राजापूर शहराची भौगोलिक रचना, व्यवसायाची एकूणच मंदीची परिस्थिती याचा विचार करता शहरात छप्परपट्टी भरून छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना दैनंदिन छप्परपट्टी भरणे शक्य होणार नाही,त्यामुळे याबाबत प्रशासनाने सुवर्णमध्ये काढून हा वाढीव दैनंदिन छप्परपट्टी आकारणीच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी केली आहे.
याबाबतचे एक लेखी निवेदन काझी यांनी सोमवारी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांना दिले आहे.
राजापूर नगर परिषद क वर्ग नगर परिषद आहे, उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादीत आहेत या बाबी मान्य आहेत. मात्र त्यासाठी अशा प्रकारे छप्परपट्टी भरून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या छोटया व्यापाऱ्यांवर अशा प्रकारे अन्याय करणे योग्य होणार नाही असे काझी यांनी नमुद केले आहे. गेले कित्येक वर्षे सहामाही छप्परपट्टी आकारणी केली जात असून तीच योग्य असून याबाबत काहीतरी सुवर्णमध्ये काढावा अशी मागणी काझी यांनी केली आहे.
यावर व्यापाऱ्यांची बैठक घेऊन आलेल्या हरकतींवर चर्चा करून नक्कीच योग्य तो निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्याधिकारी भोसले यांनी दिली आहे.
नगर परिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी नगर परिषद प्रशासनानेकडून छप्पर पट्टी धारकांकडून दैनंदिन कर आकारणीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत छप्पर पट्टी धारकांना न. प. कडून नोटीस बजावण्यात आली आहे. यावर काझी यांनी सोमवारी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. अशा प्रकारे अचानकपणे छप्पर पट्टी धारकांनी दैनंदिन कर आकारणी करण्याचा निर्णय अन्यायकारक असून आर्थिक दृष्टया अनेकांना ते परवडणारे नाही, अनेक छप्पर पट्टी धारक हे त्यांच्या खासगी जागेत व्यवसाय करतात तर काही भाडयाच्या जागेत व्यवसाय करतात. पावसाळयात काही छप्पर पट्टी धारकांची दुकाने बंदही असतात. त्यामुळे पुर्वी प्रमाणे सहा महिन्यांची छप्पर पट्टी दर आकारणी योग्य असून यात काहीतरी सुवर्णमध्य काढावा अशी मागणी काझी यांनी केली आहे. या प्रसंगी माजी नगरसेवक संजय ओगले, सौरभ खडपे उपस्थित होते.











