सौ. अर्चना घारे परब यांचा महावितरणला इशारा
वीज खंडित असलेल्या गावातील ग्रामस्थांसोबत महावितरण कार्यालयाला धडक
सावंतवाडी । प्रतिनिधी : महावितरण विभागाकडून पावसाळ्यापूर्वी दक्षता घेतली न गेल्याने सावंतवाडी शहरासह कोनशी दाभिळ, भालावल अश गावांतील लोकांना अंधारात रहायची वेळ आली आहे. आज ४० हून अधिक गावं अंधारात आहे. अधिकाऱ्यांनी पावसापुर्वी न घेतलेली दक्षता याला कारणीभूत आहे. असे असूनही वीज खंडीत झाल्यावर किंवा एखादी घटना घडल्यावर अधिकारी साधा फोनही उचलत नसून लोकांनी जायच कुठे असा संतप्त सवाल करत ही परिस्थिती येत्या चार दिवसांत न सुधारल्यास महावितरणसमोर सगळ्या ग्रामस्थांसोबत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी दिला.
अतिवृष्टीमुळे कोनशी दाभिल गावांसह परिसरातील अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मनुष्य व वित्त तसेच गोधनाची हानी होत आहे. याबाबत अर्चना घारे-परब यांच्यासह काही गावांतील ग्रामस्थांनी महावितरणला धडक देत उपकार्यकारी अभियंता चव्हाण यांना याबाबत जाब विचारला.
यावेळी जेष्ठ ग्रामस्थ विष्णु घाडी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘ काही तरी घडणार याची वाट पाहू नका. आधी दक्षता घ्या, लोकांचे फोन उचला. बील नाही भरलं तर घरी येता तसे आता या व बघा लोक कसे दिवस काढत आहेत ‘ असं सांगत असताना होणाऱ्या मनुष्य हानीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारकडून मेल्यानंतर दिले जाणारे ५ लाख हवेत कशाला, असा संतप्त सवाल विष्णू घाडी यांनी केला.
दरम्यान, आपण नुकताच पदभार स्वीकारला असून काही अधिकारी, कर्मचारी फोन उचलत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यासंदर्भात माहिती घेऊन व पावसाचा जोर कमी झाल्यानंतर लागलीच सर्व ठिकाणच्या तक्रारींचा विचार करून त्यावर तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही उपकार्यकारी अभियंता चव्हाण यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सावंतवाडी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहाराध्यक्ष सायली दुभाषी, सरचिटणीस हिदायतुल्ला खान, अल्पसंख्याक सेल महिला अध्यक्षा राबिया शेख-आगा, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर, भालावल गावचे सरपंच समीर परब, दाभिल ग्रामपंचायत मा. सदस्य विष्णू घाडी, हनुमंत जाधव, श्रीकांत कोरगावकर, श्रावणी कोरगावकर, नॉर्बर्ट डिसोजा, अनिल सरमळकर, वैभव परब आदी उपस्थित होते.











