बांदा पोलिसांची चेकपोस्ट वर मोठी कारवाई
बांदा : प्रतिनिधी :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांदा पोलिसांनी चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या दारू वाहतूकी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण ६७ लाख १० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इन्सुली चेकपोस्ट येथे मंगळवारी पहाटे कारवाई करण्यात आली
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, इन्सुली चेकपोस्टवर तपासणी सुरू असताना टँकर क्रमांक (जीजे १२ एवाय २३६५) तपासणी साठी थांबविण्यात आला. तपासणी अंती टँकरमधून गोवा बनावटीच्या ओल्ड मंक दारूचे ४६० बॉक्स (किंमत अंदाजे ४६,९२,००० रुपये) तसेच किंगफिशर बिअरचे १२० बॉक्स (किंमत अंदाजे ५,१८,४०० रुपये) असा एकूण ५२,१०,४०० रुपये किमतीचा दारूसाठा आढळून आला. यासह १५ लाख रुपये किमतीचा टँकर जप्त करण्यात आला.
या प्रकरणी टँकर चालक जोरा निंबा राम (वय ५३, रा. बाडमेर, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा सहा. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, पोलीस कर्मचारी प्रसाद पाटील, दासू पवार, तातू कोळेकर, प्रदीप नाईक, सिद्धेश माळकर, विकी गवस, शेखर मुणगेकर व प्रथमेश पोवार यांच्या पथकाने केली.











