लगबग ‘वायंगणी’ भातशेतीची!

1500 हेक्टर मध्ये भातशेती लागवडीचे उदीष्ट           

चारसुत्री, श्री लागवड पद्धत अधिक फायद्याची!       

     

          झुंजार पेडणेकर | मसुरे :                                     शेतकरी मित्रानो, कोकणात पावसाळी भातशेतीचे क्षेत्र कमी होतअसल्याचे दिसुन येत आहे. रेशनिंगवर मिळणारा मोफत तांदूळ जेव्हा बंद होईल तेव्हा जिल्ह्यात भात लागवड वाढेल असं सुद्धा काही ठिकाणी बोलताना ऐकू येत. असो, आपल्या कोकणात एक म्हण आहे, ‘कोकणी आणि भात बोकणी’. परंतू आहारावर नियंत्रण मिळविण्याच्या ‘फॅड’ मुळे सध्या जेवणामध्ये भाताचा वापर कमीच होत असल्याचे दिसून येते. अर्थात आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे सध्या चालू असलेला रब्बी भात ( वायंगणी) हंगाम! यावर्षी उशिरा पर्यंत झालेला पाऊस या भात शेतीच्या चांगलाच पथ्यावर पडल्याचे चित्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येत असून जिल्हा कृषी विभागाकडून प्राप्त माहिती नुसार चालू हंगामात जिल्ह्यात एकूण 1500 हेक्टर क्षेत्रात भातशेती लागवड करण्याचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे. मागील हंगामात साधारणपणे एकूण 1304 हेक्टर एवढ्या क्षेत्रात उन्हाळी भात शेतीची लागवड झाली होती. जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात 440 हेक्टर , दोडामार्ग 178 हेक्टर, कुडाळ 281 हेक्टर व मालवण तालुक्यात 290 हेक्टर क्षेत्रात मागील हंगामात भातशेती करण्यात आली होती.तर देवगड तालुक्यात 20 हेक्टर, वेंगुर्ला 90 हेक्टर, कणकवली 5 हेक्टर क्षेत्रात तर वैभववाडी तालुक्यात अत्यल्प लागवड झाली होती.

 

* *कोकणचे हवामान लाभदायक*

 

भातपीकाच्या उत्तम वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी उष्ण व दमट हवामान लागते. अशाप्रकारचे अनुकुल हवामान कोकणात असते. तसेच हे पीक पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमीनीत चांगले येते. मालवण तालुक्यात वायंगणी, मोगरणे, त्रिंबक, बांदिवडे, मसुरे देऊळवाडा , ओवळीये, गोळवण, काळसे, चिंदर, बागायत, मसदे आदि गावामध्ये वायंगणी शेती केली जाते. उन्हाळी भाताची पेरणी विविध पाण्याच्या उपलब्ध स्त्रोतावर जानेवारी अखेरी पर्यंत केली जाते. उन्हाळी शेतीची काही वैशिष्ठे असून उन्हाळी हंगामात भात पीकाच्या वाढीच्या काळात म्हणजेच जानेवारी – फेब्रुवारी महीन्यात प्रखर सुर्यप्रकाश असतो. त्यामुळे नत्र युक्त खतास प्रतीसाद जास्त असतो. भाताच्या वाढीस २८ ते ३३ अंश उष्ण तापमान चांगले मानवते. उन्हाळी हंगामातील जास्त तापमान व कमी आर्द्रतेचे प्रमाण यामुळे प्रतीकुल हवामानामुळे काही किटक व रोगराईचे प्रमाण खरिपापेक्षा काही प्रमाणात कमी राहते. उन्हाळी हंगामात भात पीकाची उंची खरीप पिका पेक्षा कमी असते. तसेच खरीपा पेक्षा उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण कमी असते. उन्हाळी हंगामामध्ये नियमीत व नियंत्रीत पाणी पुरवठ्या मुळे तण कमी असते अशी मालवण तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर यानी दिली आहे.

 

* *स्थानिक वाणाना पसंती*

 

भात जातीचे प्रमाणीत बियाणे खरेदी केलेले असेल तर बियाण्यास प्रक्रिया करावयाची आवश्यकता नसते. स्वत:कडील बियाण्यास प्रक्रिया करण्याची आवश्यकता असते. रत्ना, रत्नागीरी २४, मसुरी, कर्जत ६, कर्जत ५, कर्जत ४ या जातीच्या बियाण्यांपासून चांगले उत्पन्न मिळते. परंतू या सर्वाना पाण्याची भरपूर आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांची स्थानीक जातीनाच जास्त पसंदी आहे. जिल्हा कृषी विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहीती नुसार गत हंगामात सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागवड झालेल्या भातशेतीचे क्षेत्र तालुक्या नुसार पुढील प्रमाणे होते .

तालुका – लागवड झालेले क्षेत्र ( हेक्टर मध्ये)

देवगड 20

मालवण 290

कणकवली 5

वैभववाडी -0

सावंतवाडी 440

दोडामार्ग 178

वेंगुर्ला 90

कुडाळ 28

 

▪️*खत व्यवस्थापन महत्वाचे-*

 

खरीप हंगामाप्रमाणेच शेतीची नांगरणी व चिखलणी आपण करतो. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व जास्तीत जास्त भातपीकाचे उत्पादन मिळविण्यासाठी १० टन शेणखत प्रती हेक्टरी नांगरट करताना जमीनीत मिसळावे. शिफारस केल्या प्रमाणे भातपिकाला हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फूरद, व ५० किलो पालाश खत द्यावे. त्यामध्ये लावणीच्यावेळी दिलेल्या खताखेरीज उरलेला ५० किलो नत्र ( ५४ किलो युरिया) लावणी नंतर ३० दिवसानी आणि उरलेले २५ किलो नत्र ( ५४ किलो युरिया) लावणी नंतर ६० दिवसानी द्यावे असे कृषी तज्ञ सांगतात.

 

▪️*पाणी व्यवस्थापन-*

 

लावणी नंतर ३० दिवसा पर्यंत शेतातील पाण्याची पातळी २ ते ३ से. मी. एव्हढी ठेवावी. नंतर फुटवा येण्याच्या कालावधी मध्ये पाण्याची पातळी ४ ते ५ सें. मी. एव्हढी वाढवावी. पीक तयार होईपर्यंत ही पाण्याची पातळी स्थिर ठेवावी. कापणी पूर्वी शेतातील पाण्याचा पूर्ण निचरा करावा. त्यामुळे भातपीक एकाच वेळी कापणीस तयार होईल. कापणी आधी खोडकीडी ग्रस्त भात रोपे उपटून त्याचा नाश करावा. त्यामुळे पुढील हंगामात खोडकिड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.

 

▪️*चारसुत्रि किंवा श्री लागवड फायद्याची-*

 

मित्रानो आपण पारंपारिक पद्धतीनेच ही भातशेती जास्त करतोय. परंतू यासाठी जर चारसुत्री किंवा श्री पद्धत वापरली तर फायद्या मध्ये मोठी वाढ होईल. श्री पद्धतीमध्ये केवळ एक कीलो बियाण्यामध्ये एक हेक्टर ऐव्हढ्या क्षेत्रामध्ये भात लागवड करता येते. तसेच जास्त पाणी सुद्धा या पद्धतीमध्ये लागत नाही. मुळाना आवश्यक आॅक्सिीजन मिळेल एव्हढेच पाणी खाचरात ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे श्री पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी १०० ते १२० क्विंटल भात आपल्याला मिळते. हेच प्रमाण पारंपारीक पद्धतीने भातशेती केल्यास ४० ते ५५ क्विंटल एव्हढे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकच्या फायद्याला न मुकता या श्री, चारसुत्री पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याची माहीती श्री करंदीकर यानी दिली आहे. शेतकऱ्यानी कृषी विभागाकडे संपर्क साधल्यास याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

 

▪️*ग्रीन क्लायमेट फंड प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन! तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर*

 

यु एन डी पी अंतर्गत ग्रीन क्लायमेट फंड या प्रकल्प अंतर्गत श्री पद्धतीने भात लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. खरीप हंगामामध्ये घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांचा व प्रशिक्षणांचा रबी हंगामातील भात लागवडी साठी सुद्धा फायदा झाला आहे.

त्याचबरोबर चार सूत्री पद्धतीने भात लागवड व एस आर टी पद्धतीची शून्य मशागतीची भात लागवड यादेखील भाताचे उत्पादन वाढविण्यासाठी परिणामकारक ठरत आहेत.

संकरित बियाणी अधिक उत्पादन देत असली तरी देखील पारंपारिक बियाण्यांना अधिक दर मिळत असल्याने पारंपारिक बियाण्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांचा कल वाढत आहे असे कृषी अधिकारी अमोल करंदीकर सांगतात.

शेतकरी मित्रानो चालू हंगामात नदी, तसेच छोट्या वहाळांवर बांध बांधण्यात आले आहेत. अजुनही या शेतीसाठीचा हंगामा संपलेला नाही आहे. मजुरांचा भेडसावणारा प्रश्न यांत्रीकीकरणाच्या माध्यमातून दुर करणे आपल्याला शक्य आहे. फक्त मेहनत घेण्याचा निश्चय करा व पारंपारीकते पासून थोडे दुर जावून श्री , चारसुत्री पद्धत अवलंबल्यास फायदा तुमचाच असेल!