राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी Adv. शशिकांत सुतार तर उपाध्यक्षपदी विवेक गादीकर यांची बिनविरोध निवड

राजापूर अर्बन बँकेच्या अध्यपदी अ‍ॅड.शशिकांत सुतार यांची तर उपाध्यक्षपदी विवेक गादीकर यांची बिनविरोध झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार पाटील याप्रसंगी मावळते अध्यक्ष संजय ओगले, विजय पाध्ये यांसह संचालक.
राजापूर (प्रतिनिधी): येथील राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी संचालक अ‍ॅड. शशिकांत सुतार यांची तर उपाध्यक्षपदी विवेक गादीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विवेक गादीकर यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी गुरूवारी २९ जानेवारी रोजी बँकेच्या राजापूर शाखा प्रशिक्षण सभागृहात सहाय्यक निबंधक संतोषकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
राजापूर अर्बन बँकेवर सत्तास्थानी असलेल्या सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या वतीने अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी एक वर्षाचा कार्यकाळ निश्चित करण्यात आलेला आहे. आपली एक वर्षाची मुदत संपल्याने बँकेचे अध्यक्ष संजय ओगले व उपाध्यक्ष विजय पाध्ये यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. या रिक्त झालेल्या पदांसाठी ही निवडणूक झाली.
अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. शशिकांत सुतार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते, तर उपाध्यक्ष पदासाठी गुरूवारी गादीकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. या दोघांचीही या पदांवर बिनविरोध निवड झाली.  अ‍ॅड. सुतार यांनी यापुर्वी बँकेवर तज्ञ संचालक म्हणून पाच वर्षे काम केले आहे. त्यानंतर ते गत निवडणूकीत सहकार पॅनेलकडून निवडून आले आहेत व त्यांना प्रथमच बँकेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. तर विवेक गादीकर हे प्रथमच संचालक म्हणुन निवडून आलेले असून त्यांना आता दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे.
अ‍ॅड. सुतार यांची अध्यक्षपदी  व गादीकर यांची उपाध्यक्षपदी निवड होताच निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. यानंतर मावळते अध्यक्ष संजय ओगले व उपाध्यक्ष विजय पाध्ये यांनी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले. यानंतर बँकेचे ज्येष्ठ संचालक जयंत अभ्यंकर यांसह सर्व संचालकांनी तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांसह अधिकारी व कर्मचारी यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.
जिल्हा बँकेचे संचालक मंदार सप्रे, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते व सर्व पदाधिकारी, दीवाकर आडविरकर, नंदकुमार मिरगुले, जानशी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रसाद शिवणेकर, अरवींद लांजेकर, श्री. तावडे आदींसह विविध राजकिय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अ‍ॅड. शशिकांत सुतार यांच्या मातोश्री श्रीमती तारामती सुतार, पत्नी सौ. समिधा सुतार, ज्येष्ठ बंधू बलवंत सुतार, सौ. स्नेहल बलवंत सुतार, पारस सुतार आदींसह मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार पाटील यांनी राजापूर अर्बन बँकेच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही संचालक मंडळ, सभासद यांच्या विश्वासाने बँक निश्चितच आपली प्रगती साधेल अशा शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संचालक दिनानाथ कोळवणकर, अनिलकुमार करंगुटकर यांनी मनोगत व्यक्त करून नुतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. तर अ‍ॅड. शशिकांत सुतार यांनी भविष्यात बँकेच्या प्रगतीसाठी आंम्ही कटीबध्द असू अशी ग्वाही दिली. याप्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक जयंत अभ्यंकर, राजेंद्र कुशे, अनिलकुमार करंगुटकर, किशोर जाधव, दिनानाथ कोळवणकर, प्रसाद मोहरकर, अल्ताफ संगमेश्वरी, सौ. प्रतिभा रेडीज, राजापूर शाखाधिकारी रोहित सामंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सहाय्यक व्यवस्थापक रमेश काळे यांनी केले.