खेड तालुक्यात श्री विराट विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी होणार

खेड (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील सुसेरी नं 1 (साठवाडी) येथे श्री विराट विश्वकर्मा मित्र मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने भगवान श्री विराट विश्वकर्मा जयंती मोठ्या भक्तिभावात आणि सांस्कृतिक उत्साहात साजरी केली जाणार आहे. स्थापनेपासून सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय असलेल्या या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी श्री प्रभू विश्वकर्मांची पूजा, महाआरती, हरिपाठ आणि महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. सकाळी पूजा विधीने कार्यक्रमाची सुरुवात होईल, दुपारी आरती संपन्न होईल, तर सायंकाळी हरिपाठ होणार आहे. रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर कोकणचा साज रंगणारा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमात कोकणातील कला, संस्कृती, जाखडी नमन, भजन तसेच स्थानिक कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. ‘कोकणचा साज – संगमेश्र्वरी बाज’ या कार्यक्रमातून कोकणातील लोककलेचे एकत्रित दर्शन घडणार असून, यासाठी समर्थ कृपा प्रोडक्शन, रत्नागिरी यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
भगवान श्री विश्वकर्मा हे सृष्टीचे रचनाकार, वास्तुशास्त्राचे अधिष्ठाता आणि श्रमिकांचे आराध्य दैवत मानले जातात. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारा हा विश्वकर्मा जयंती सोहळा सुसरी परिसरात विशेष आकर्षण ठरणार आहे.