शौचालय घोटाळ्याची होणार चौकशी : नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे

पहिल्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांची अनुपस्थिती; शहर स्वच्छता; रखडलेले मानधनाचा विषय गाजला

रत्नागिरी: प्रतिनिधी : तब्बल ४ वर्षानंतर सार्वत्रिक निवडणूक होऊन झालेल्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शौचालय घोटाळा गाजला. याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल अशी ग्वाही नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी सभागृहाला दिली.

सर्वसाधारण सभेमुळे नगर परिषदेचे सभागृह इतक्या वर्षानंतर गजबजून गेले होते. अजेंड्यावरील विषयाबरोबरच अपेक्षेप्रमाणे सभेत शौचालय घोटाळ्याचा विषय गाजला. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी उघड केलेल्या या घोटाळ्यामुळे नगर परिषदेतील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे द्यावे दणाणले असतानाच हा विषय आज सभागृहात आला. सदस्यांनी यावर चर्चेची मागणी करत दोषींवर कारवाईची मागणी केली. या घोटाळ्याशी संबंधित अधिकारी या सभेत अनुपस्थित असल्याने सदस्य आक्रमक झाले. त्याचवेळी जे जे अधिकारी आजच्या महत्व चे या सभेला अनुपस्थित होते त्याबद्दल नगराध्यक्षांसह सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जनतेचे प्रश्न मांडताना संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नसतील, तर समस्या सुटणार कशा? असा संतप्त सवाल नगरसेवकांनी यावेळी उपस्थित केला. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी नगरसेवकांच्या भावना लक्षात घेऊन, अनुपस्थित अधिकाऱ्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले तसेच उघड झालेल्या शौचालय घोटाळ्याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई होईल अशी ग्वाही नगराध्यक्षा यांनी दिली. यासाठी विशेष सभा सुद्धा घेण्यात येणार असल्याचे सुद्धा सुद्धा त्यांनी जाहीर केले.

आज, ३० जानेवारी २०२६ रोजी, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला शहरातील सर्व प्रभागांतील नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या. सभेच्या सुरुवातीपासूनच शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्यांचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. आपापल्या प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा आणि शहर स्वच्छता याला सदस्यांनी प्राधान्य दिले. यावेळी नगराध्यक्षांनी शहरातील विकासकामांना गती देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

कंत्राटी कामगारांचे वेतन वेळेवर होत नसल्याचा मुद्दा सभागृहात मांडला गेला. याबाबत तातडीने पावले उचलू असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले.