खेड (प्रतिनिधी) – मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर उधळे येथील दीपक हॉटेल परिसरात आज दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास अपघाताची घटना घडली. मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोने रस्त्याच्या कडेला झाडांना पाणी देण्यासाठी उभ्या असलेल्या टँकरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
अपघातग्रस्त आयशर टेम्पोचा क्रमांक MH 04 KU 4261 असून, धडकेमुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत श्यामलाल मुंडा रजक (वय ४६, राहणार शिरपूर सपना, मध्य प्रदेश) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली तैनात असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्य जी संस्थान नाणिज धाम यांची २४ तास अपघात मदतीसाठी सेवेत असलेली विनामूल्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
रुग्णवाहिकेचे चालक सुरज हंबीर यांनी जखमी व्यक्तीस तत्काळ प्राथमिक मदत देत उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. घटनेची नोंद संबंधित यंत्रणांकडून घेण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.













