जेष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांचे निधन

मुंबई : तीन दशकांहून अधिक काळ आपल्या सिद्धहस्त लेखणीनं पत्रकारिता, साहित्य आणि क्रीडा क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणारे जेष्ठ पत्रकार तथा लेखक शिरीष कणेकर यांचे निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.
षटकार, चंदेरी सारख्या मासिकांमधून कणेकर यांनी केलेले लेखन हे कित्येक वाचकांच्या उत्सुकतेचा आणि कौतूकाचा विषय होता. चित्रपट, संगीत व क्रीडा क्षेत्रातील वेगवेगळ्या घडामोडींवर खुमासदार लेखन केले होते. त्याच प्रमाणे समाजकारण, राजकारण, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील विविध घडामोडींवर त्यांचे लेखन वाचकप्रिय झाले होते.
त्यांचे कणेकरी, माझी फिल्मबाजी नावाचे कार्यक्रम विशेष लोकप्रिय राहिले होते.
कणेकर यांना कॅनडाच्या पंतप्रधानांकडून गौरविण्यात आले होते. याशिवाय साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते. विविध वृत्तपत्र, मासिकांमधून चित्रपट, साहित्य आणि क्रीडाविषयक क्षेत्रातील अनेक घडामोडींवर त्यांनी केलेलं लेखन लोकप्रिय झाले होते. त्यांची ३० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
त्यामुळेच की काय त्यांचे लेखन वाचण्यासाठी वाचक नेहमीच त्यांच्या नव्या लेखाची प्रतिक्षा करायचे. त्यांच्या जाण्यानं साहित्य, क्रीडा क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.