तरुणांना रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेणार

तळवली पंचायत समिती गणाचे भाजपचे उमेदवार मंगेश जोशी यांनी सांगितले आपले विकासाचे व्हिजन
गुहागर प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना घरोघरी पोहचवून त्याचा लाभ तळागाळातील लोकांना कसा घेता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असणार असून येथील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्याचे आपले विकासाचे व्हिजन असणार आहे असे तळवली पंचायत समिती गणाचे भाजपाचे उमेदवार मंगेश जोशी यांनी स्पष्ट केले.
तळवली पंचायत समिती गणातून युतीकडून भाजपचे मंगेश जोशी हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. माजी आम.डॉ. विनय नातू यांचे विश्वासू सहकारी, कारुळचे माजी सरपंच व सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेले म्हणून त्यांची ओळख आहे.यावेळी दैनिक प्रहारशी बोलताना त्यांनी आपले तळवली पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत असताना विकासाचे व्हिजन स्पष्ट केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,या भागातील जनतेचे जे प्रश्न आहेत ते पंचायत समितीच्या माध्यमातून सोडविण्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या आव्हानांबाबत बोलताना ते म्हणाले की,मी अनेक वर्षे राजकारणात व समाजकारणात आहे त्यामुळे प्रत्येक वाडी व घरचा कोणता प्रश्न आहे हे आपल्याला माहित असल्याने कोणाला कसा न्याय देता येईल हे माहित आहे त्यामुळे आपल्याला आव्हान असे वाटत नाही.
बदलेल्या नवीन जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाच्या रचनेबाबत आपल्याला मोठी अडचण नसून नव्याने जोडलेल्या गावात आपले कार्यकर्ते चांगले काम करत आहेत त्याचा फायदा नक्कीच मला होऊन चांगले मतदान याठिकाणी होईल अशी अपेक्षा आहे. माझा मतदार संघ हा ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे येथील अनेक तरुण नोकरीनिमित्त बाहेर जातात यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत.माझा स्वतःचा ऍग्रोटूरिझमचा व्यवसाय आहे.यातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे.असेच लघु उद्योग येथील तरुणांनी सुरू करावेत त्यासाठी लागणारे आवश्यक सहकार्य आपण नक्कीच करू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आरोग्य विषयी बोलताना ते म्हणाले की, केंद्राच्या माध्यमातून तळवली येथे भव्य आरोग्य मंदिर उभारले आहे. जिल्हा परिषद गटातून याठिकाणी आरोग्य सेवेत अनेक वर्ष काम केलेले डॉ. राजेंद्र पवार यांच्या माध्यमातून व मी स्वतः येथील रुग्णांना अधिक चांगली आरोग्य सेवा कशी देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.