वेसवी नांदगाव अंगणवाडीत राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

 मंडणगड (प्रतिनिधी)  : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत बिट उमरोली येथील वेसवी नांदगाव अंगणवाडी केंद्रात राष्ट्रीय जंतनाशक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बिट पर्यवेक्षिका एस. एस. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. तसेच बालकांचे आरोग्य, स्वच्छता आणि कृमिमुक्त भारत या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविका शलाका पवार यांनी एक ते एकोणीस वर्षे वयोगटातील मुलांमध्ये जंतसंसर्गामुळे उद्भवणाऱ्या विविध आरोग्य समस्यांची माहिती दिली. जंतसंसर्गामुळे अशक्तपणा, रक्ताची कमतरता, थकवा, वजन न वाढणे तसेच एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बालकांना जंतनाशक गोळ्यांचे महत्त्व समजावून सांगतानाच वैयक्तिक स्वच्छतेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुणे, चप्पल-बूट वापरणे, नखे नियमित कापणे आणि शौचालयाचा योग्य वापर करणे याबाबत मुलांना सूचना देण्यात आल्या. स्वच्छतेच्या सवयी अंगीकारल्यास जंतसंसर्गाचा धोका कमी करण्यास मदत होते, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या कार्यक्रमाला उज्ज्वला महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई काळपे, माता पालक कथाजी खाडे, वेदिका काळपे, सुवर्णा खाडे, ज्येष्ठ माता सुलोचना खाडे तसेच अंगणवाडीतील बालके उपस्थित होती.
कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांचे आरोग्य चांगले राखणे, जंतसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि स्वच्छतेच्या सवयी विकसित करणे हा संदेश देण्यात आला. शेवटी अंगणवाडी सेविका शलाका पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.