बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवार उमेदवार होण्याची दाट शक्यता

अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीत राजकीय हालचाली

भावनिक पार्श्वभूमीमुळे बिनविरोध निवडीची चर्चा

बारामती विधानसभा मतदारसंघात पती अजित पवार यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक अटळ झाली आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार उमेदवारी स्वीकारण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. भावनिक वातावरण लक्षात घेता त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याची भूमिका इतर पक्ष घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. कायद्यानुसार सहा महिन्यांच्या आत ही पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. सुनेत्रा पवार यांच्यासाठी बारामतीची जागा मंत्रिमंडळात कायम राहण्याचा महत्त्वाचा मार्ग मानला जात आहे.


पुणे : पती अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार उमेदवारी लढवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. बारामतीतील भावनिक वातावरण लक्षात घेता, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या विरोधात कोणताही पक्ष उमेदवार उभा करणार नाही, अशी शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मधील कलम 151A नुसार, एखादी आमदारकीची जागा रिक्त झाल्यास ती सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणुकीद्वारे भरली जाणे बंधनकारक आहे. अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्याने बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक यावर्षी २८ जुलैपूर्वी घेणे आवश्यक ठरणार आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेली असल्याने बारामती विधानसभेची जागा ही त्यांच्यासाठी मंत्रिमंडळात कायमस्वरूपी स्थान मिळवण्याचा सर्वात निश्चित मार्ग मानला जात आहे. या प्रक्रियेत त्यांना राज्यसभेची जागा सोडावी लागण्याची शक्यता असून, ती जागा कुटुंबातील सदस्याकडे जाण्याची चर्चा देखील सुरू आहे.