राजापुरात भीषण अपघात: कोंडये पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

राजापूर | प्रतिनिधी : राजापुरात मुंबई गोवा महामार्गावर कोंडये येथील पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी चार तीस ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून या व्यक्तीचे वय 25 ते 28 असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अपघातानंतर पोलीस कोंडये येथील ग्रामपंचायत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर कोंडये येथे पुलावर हा अपघात झाला आहे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांच्या कयास आहे मात्र यातील मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

या अपघाताची माहिती कळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पोलीस कॉन्स्टेबल वारिक, घोगले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेज पाहीले जात आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती कोंडये ब्रीज खाली दिसला असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्याच्या सोबत कोण होते का याबाबत सीसीटीव्ही फूटेज पाहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही व्यक्ती जागेवरच मृत अवस्थेत आढळली. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला असावा असा कयास आहे.

या अपघातानंतर पोलिसांनी सदर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नाना कुवळेकर यांच्या रुग्णवाहिकेने राजापूर ग्रामीण रुग्णालयात आणला असून तेथून हा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवागृहात ठेवण्यात येणार आहे