औंध रोडवर पीएमपीएमएल बसची धडक; ज्येष्ठ महिलेचा मृत्यू, मैत्रीण जखमी

औंध रोडवरील भीषण अपघात

चतुश्रृंगी पोलिसांकडून बसचालकावर गुन्हा दाखल

पुण्यातील औंध रोड परिसरात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात एका 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिची 74 वर्षीय मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. पीएमपीएमएल बसने रस्ता ओलांडत असताना या दोघींना धडक दिली. दोन्ही महिला शिवाजीनगरहून औंध रोडकडे परत येत होत्या. बसस्थानकावर उतरल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या बसमुळे त्यांनी रस्ता ओलांडण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर चतुश्रृंगी पोलिसांनी संबंधित बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


पुणे : औंध रोडवरील इंदिरा वसाहत परिसरात घडलेल्या अपघातात चंद्रकला ज्ञानोबा वाव्हाळ (वय 75) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या मैत्रीण प्रभावती भोसले (वय 74) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली.

चतुश्रृंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला शिवाजीनगर येथे गेल्या होत्या आणि पीएमपीएमएल बसने औंध रोडवर परतल्या. बसस्थानकावर उतरल्यानंतर पाठीमागून दुसरी पीएमपीएमएल बस येत असल्याने त्यांनी रस्ता ओलांडण्याचा निर्णय घेतला.

याच वेळी पीएमपीएमएल बसचालकाने नियंत्रण न राखता रस्ता ओलांडणाऱ्या महिलांना धडक दिली. या धडकेत चंद्रकला वाव्हाळ गंभीर जखमी झाल्या होत्या आणि त्यांचा मृत्यू झाला, तर प्रभावती भोसले या जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला गृहिणी असून कोणालातरी भेटण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. या प्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी शनिवारी सकाळी पीएमपीएमएल बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.