उमेदवाराने प्रचार थांबवून महिलेला हॉस्पिटलमध्ये केले दाखल
रत्नागिरी :
शहरा लगतच्या जाकीमिऱ्या आनंदनगर कॉलनी परिसरातील माळरानावरील जंगलात लागलेल्या वणव्यात लाकड गोळा करण्यासाठी गेलेली वृध्द महिला भाजल्याची घटना घडली. हा प्रकार लक्षात येताच निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरणारे उमेदवार अबू भाटकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत त्यांना प्रचाराच्या वाहनातूनच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सोमवारी सकाळी आनंदनगर कॉलनी परिसरात राहणाऱ्या वनिता भिकाजी जाधव (वय 65) या सुकी लाकडे गोळा करण्यासाठी जंगलभागात गेल्या होत्या. याचवेळी माळरानात वणवा भडकला. अचानक लागलेल्या या वणव्यात त्या होरपळल्या. हा प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी धावपळ केली. हा प्रकार सुरु असताना पंचायत समितीचे उमेदवार आदेश उर्फ अबू भाटकर हे मयुरेश पाटील, त्यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेच्या उमेदवार आसता धांगडे यांचे पती अमित धांगडे, राधिका राजेंद्र जाधव, सावी जाधव, मैथिली जाधव, गौतम पवार, सुधीर जाधव, सुशांत जाधव, अक्षय जाधव, आशिष पवार, राकेश जाधव, अमिता जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, आगीत होरपळलेल्या वनिता जाधव यांना बाहेर काढले. या घटनेची माहिती उपस्थितांनी नगर परिषदेलाही दिली. यानंतर आदेश भाटकर यांनी आपला प्रचार बाजूला ठेवत, प्रचाराच्या वाहनामधूनच होरपळलेल्या वनिता जाधव यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.











