ना. एकनाथ शिंदे आज रत्नागिरीत; शिवसेनेच्या जिल्ह्यात दोन सभा

रत्नागिरी । प्रतिनिधी : जिल्हा परिषद निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आज मंगळवारी रत्नागिरीत येत असून त्यांच्या जिल्ह्यात दोन सभा होत आहेत.

या आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे २८ जानेवारीला होणार होती. मात्र त्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यानंतर ही सभा रद्द झाली होती. तर निवडणूक प्रचारावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला दिसून येत होता.

मात्र आता एकनाथ शिंदे ३ फेब्रुवारीला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून चिपळूण आणि रत्नागिरीत तसेच कुडाळ सिंधुदुर्ग येथे त्यांच्या सभा होत आहेत. चिपळूण येथे दुपारी १२.३० वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात ही सभा होईल तर रत्नागिरीत दुपारी २.०० वाजता साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ ना. शिंदे यांची जिल्ह्यातील दुसरी सभा होणार आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आ. किरण सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना सचिव संजय मोरे, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, राहुल पंडित उपस्थित राहणार आहेत.

यानंतर ना. शिंदे सिंधुदुर्ग येथे रवाना होतील. तेथे कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर त्यांची सभा होणार असून यावेळ आ. दिपक केसरकर आणि आ. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.