आमदारांची प्रतिष्ठा पणाला तर उबाठा पक्षाची अस्तित्वाची लढत
संतोष कोत्रे
लांजा -: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यानंतरचे चित्र स्पष्ट झाले असून अनेक ठिकाणी दुरंगी तिरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढत होणार आहे. असे असले तरी खरी लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा यांच्यातच होणार आहे. चार जिल्हा परिषद गटापैकी भांबेड आणि आसगे येथील लढती या हायव्होल्टेज होणार आहेत. या ठिकाणी दोन्ही शिवसेनेच्या बड्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. तर भांबेड प्रभानवल्ली, खानवली, गवाणे व वेरवली बुद्रुक या पंचायत समिती गणातील निवडणूक देखील लक्षवेधी ठरणार आहे. चार जि.प.आणि आठ पं.स. गणांवर आपला वरचष्मा राखण्यासाठी आमदार किरण सामंत प्रयत्नशील आहेत तर उबाठा पक्षासाठी ही अस्तित्वाची लढाई असल्याने कॉंटे की टक्कर पहावयास मिळणार आहे.
लांजा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणासाठी सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपले कौशल्य आणि पणाला लावले आहे. शिवसेनेकडून आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची फौज ही आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरली आहे. या याउलट मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रमाणात पडझड झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी ही निवडणूक ‘करो या मारो ‘ अशी ठरणार आहे.
शिवसेना पक्ष फुटीनंतर तालुका आणि शहर पातळीवरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांची बाजू भक्कम झाली आहे. असे असले तरी आजही ग्रामीण भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानणारी लोक आहेत. पक्षाला आजही ग्रामीण भागात जनाधार आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते गेले तरी मतदार अजूनही शिवसेना उबाठा पक्षाच्या पाठीशी आहे. हीच त्याच्या जमिनीची बाजू आहे. आमदार किरण सामंत यांनी लांजा नगरपंचायत निवडणुकीत दमदार यश मिळवल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण लक्ष हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर केंद्रित केले आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक ही शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा यांच्यातच रंगणार आहे.
या निवडणुकीत काही जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातील लढती या हाय व्होल्टेज आणि लक्षवेधी ठरणार आहेत. यातील भांबेड जि प गटाची निवडणूक ही हाय व्होल्टेज लढत मानली जाते आहे. या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी असलेल्या विनय गांगण यांनी आपली पत्नी माजी सरपंच विनया गांगण यांना रिंगणात उतरवले आहे. तर त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठाच्या महिला जिल्हा संघटक असलेल्या उल्का विश्वासराव यांनी आपली कन्या अचला विश्वासराव यांना मैदानात उतरवले आहे. हे दोन्ही उमेदवार सर्वच दृष्टीने सक्षम असल्याने आणि दोघांचाही जनसंपर्क दांडगा असल्याने या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दुसरी हाय व्होल्टेज लढत होणार आहे ती आसगे जि प गटात. या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी असलेले आणि ‘राजकीय चाणक्य’ अशी ओळख असलेले गणेश लाखण यांनी आपली पत्नी मनीषा लाखण यांना मैदानात उतरवले आहे. तर त्यांच्या विरोधात उबाठा शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी असलेले अभिजित राजेशिर्के यांनी आपली पत्नी अनन्या राजेशिर्के यांना रिंगणात उतरवून मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या लढतीत कोण ‘बाजीगर’ ठरणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
गवाणे जिल्हा परिषद गटातील निवडणूक ही तिरंगी होणार आहे.या ठिकाणी शिवसेना, शिवसेना उबाठा विरुद्ध बसपा अशी लढत होणार असली तरी खरी लढत ही शिवसेनेच्या संतोष रेवाळे विरुद्ध शिवसेना उबाठाच्या चेतन दळवी यांच्यातच होणार आहे. या ठिकाणी संतोष रेवाळे यांचे पारडे जड मानले जात असले तरी विविध आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या कामाचा फायदा हा चेतन दळवी यांना होऊ शकतो असे राजकीय जाणकारांचे मत आहे. तर साटवली जिल्हा परिषद गटातून माजी पंचायत समिती सभापती असलेल्या लीला घडशी या शिवसेनेकडून मैदानात उतरलेल्या आहेत. त्यांच्या विरोधात या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसकडून मनीषा जाधव या त्यांना लढत देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या ठिकाणी लीला घडशी यांच्या बाजूने विजयाचे पारडे जड असले तरी मनीषा जाधव या देखील चांगल्या लढत देतील अशी अपेक्षा आहे.
जिल्हा परिषद गटाप्रमाणेच काही पंचायत समिती गणातील निवडणुकाही तितक्याच लक्षवेधी आणि हाय व्होल्टेज ठरणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे भांबेड पंचायत समिती गण होय. शिवसेना भाजपा युतीमध्ये हा गण भाजपाच्या वाट्याला सोडण्यात आला आहे. या ठिकाणी भाजपाचे तालुकाध्यक्ष शैलेश खामकर हे रिंगणात उतरले आहेत. दांडगा जनसंपर्क आणि शिवसेनेचे पाठबळ या त्याच्या जमेच्या बाजू आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे युवराज हांदे आणि मनसेचे किरण रेवाळे यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. किरण रेवाळे यांनी बैलगाडी सारख्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरवून आपल्या नावाचा जलवा निर्माण केलेला आहे. तर ग्रास रूटला पक्षाला असलेला जनाधार ही बाब युवराज हांदे यांच्यासाठी जमेची बाजू म्हणावी लागेल. या ठिकाणी सचिन बेर्डे हे अपक्षपणे रिंगणात उतरले असले तरी खरी लढत ही दोन शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये होणार असून या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे
पंचायत समिती गणातील दुसरी तगडी लढत ही प्रभानवल्ली गणात पहावयास मिळणार आहे. या ठिकाणी देखील शिवसेनेच्या उमेश पत्की आणि शिवसेना उबाठाकडून राजेंद्र घडशी हे आमने सामने ठाकले आहेत.. बसपा कडून आनंद कांबळे हे देखील रिंगणात उतरले आहेत. तर भाजपाचे पदाधिकारी असलेल्या संकेत घाग यांनी अपक्ष उमेदवारी पेश करत प्रस्थापित राजकीय पुढार्यांसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. निवडणूकी पूर्वीच स्वखर्चातून केलेली विविध विकास कामे, गोरगरीब जनतेची केलेली कामे आणि त्यातून या गणात असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे अपक्ष उमेदवार असूनही संकेत घाग यांनी प्रस्थापितांच्या तोंडात फेस आणला आहे.
खानवली पंचायत समिती गणातील निवडणूक ही पंचरंगी होणार आहे. या ठिकाणी शिवसेने कडून माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले यशवंत वाकडे हे रिंगणात उतरले असून त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठा पक्षाकडून माजी पंचायत समिती उपसभापती लक्ष्मण मोर्ये यांनी दंड थोपटले आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी प्रथमेश घोडेकर हे नशीब आजमावत आहेत. तर बसपा कडून चंद्रकांत गीते आणि अपक्ष उमेदवार म्हणून संजय रेवाळे हे रिंगणात आहेत. या ठिकाणी पंचरंगी निवडणूक होणार असल्याचे चित्र असले तरी खरी लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा यांच्यातच होणार आहे. या दोन्ही माजी उपसभापती, जिल्हा परिषद सदस्यांचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक ठरणार आहे. गवाणे पंचायत समिती गणातील निवडणूक देखील लक्षवेधी ठरणार आहे. या ठिकाणी शिवसेना उबाठा कडून पायल साळवी तर शिवसेना पक्षाकडून माजी पंचायत समिती सभापती दिपाली दळवी साळवी या रिंगणात आहेत. मात्र या ठिकाणी स्थानिकांना डावलून दिपाली दळवी साळवी यांच्या रूपाने आयात उमेदवार उभा असल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे.त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही नाराजी मतात परिवर्तन झाल्यास दिपाली दळवी यांना फटका बसू शकतो.
साटवली पंचायत समिती गणातील निवडणूक देखील लक्षवेऊ असून या ठिकाणी माजी उपसभापती असलेले आदेश आंबोळकर हे शिवसेनेकडून रिंगणात उतरले असून त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठा पक्षाकडून रमेश कदम हे निवडणूक लढवत आहेत. तर बसपाकडून उज्वल पवार यांनी उमेदवारी पेश केली असली तरी खरी लढत ही दोन्ही शिवसेना मध्ये होणार आहे. वाकेड पंचायत समिती गण हा देखील विशेष चर्चेत आला आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी असलेल्या रसिका मेस्री या रिंगणात असून त्यांच्या विरोधात शिवसेना उबाठा कडून दक्षता राजापकर या निवडणुकीला सामोरे जात आहेत. वेरवली बुद्रुक पंचायत समिती गणातील निवडणूक देखील लक्षवेधी ठरणार आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या साक्षी चव्हाण या रिंगणात असून त्यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या नीलिमा जाधव यांनी जोरदार आव्हान उभे केल्याने या दोघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून मानसी पवार या देखील निवडणुकीला सामोरे जात आहेत.
आसगे पंचायत समिती गणातून माजी पंचायत समिती सभापती असलेल्या मानसी आंबेकर या रिंगणात उतरलेल्या असून त्यांच्या विरोधात बसपाच्या श्रावणी कांबळे आणि शिवसेना उबाठा पक्षाकडून आसावरी मांडवकर या उभ्या टाकल्या आहेत. या ठिकाणी मानसी आंबेकर यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र तरी देखील शिवसेनेच्या आसावरी मांडवकर यांनी तगडे आव्हान उभे केले आहे.











