उपनगराध्यक्षांना अपशब्द वापरणे भोवले
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेचे अभियंता यतीराज जाधव यांना तातडीने निलंबित करून चौकशी करावी अशा आशयाचा ठराव सोमवारी रत्नागिरी न.प.च्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांना अपशब्द वापरणे भोवले असून या ठरावाची प्रत कारवाईसाठी नगर विकास संचालनालयाकडे पाठविण्यात येणार असून कारवाईबाबत ते काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेचे सोमवारी २ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज झाले. २२ जानेवारी रोजी झालेल्या सभेत उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी केलेल्या काही आरोपांवर उत्तर देताना अभियंता यतीराज जाधव यांनी अपशब्दांचा वापर केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे जाधव यांच्याविषयी नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर २ फेब्रुवारीला विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत यतीराज जाधव यांना निलंबित करावे आणि त्यांची चौकशी करावी अशी मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव एकमताने मंजूर झाला.












