कायदेशीर कारवाईची मागणी
नगराध्यक्ष आणि पोलिसांना निवेदन
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या नारायण तलाव येथे ३० जानेवारी रोजी सायंकाळी काही स्त्री आणि पुरुषांनी नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला आहे,यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
३० जानेवारी रोजी नारायण तलाव येथे सायंकाळी काही स्त्री आणि पुरुषांनी नमाज पठण करत होते. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी ही सार्वजनिक जागा असल्याचे सांगून त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
या घटनेची गंभीर दखल घेत चिपळूणमधील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची भेट घेतली आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. यावेळी नगराध्यक्षांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन, कृत्य करणाऱ्यांवर नगर परिषद प्रशासन गुन्हे दाखल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले आहे.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केवळ नमाज पठण करणाऱ्यांवरच नव्हे, तर त्यांना अशा कृत्यासाठी अनुमती देणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे एक निवेदन चिपळूणचे पोलीस निरीक्षक मेंगडे यांनाही सादर करण्यात आले आहे. इन्स्पेक्टर मेंगडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून उचित कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.











