डेहराडूनमध्ये भीषण अपघात; प्रवासी बस खोल दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू

कलसी भागातील मीनाक रोडवरील कुआनू येथे दुर्घटना
एसडीआरएफकडून तातडीची बचाव मोहीम

उत्तराखंडच्या डेहराडून जिल्ह्यात मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात प्रवासी बस खोल दरीत कोसळली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ३० प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एसडीआरएफच्या विविध पथकांनी संयुक्तपणे बचाव कार्य राबवले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


डेहराडून : डेहराडून जिल्ह्यातील कलसी भागातील मीनाक रोडवरील कुआनू येथे मंगळवारी सकाळी एक प्रवासी बस खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. डेहराडून नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते.

अपघाताची माहिती मिळताच डाकपठार, चक्रता, मोरी आणि ट्यूनी येथील एसडीआरएफच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकांनी दरीत उतरून मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बस हिमाचल रोडवेजची असल्याचे समोर आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.