लोणावळ्यात ट्रेकिंगला गेलेल्या कायद्याच्या विद्यार्थिनीचा टायगर पॉइंटच्या दरीत मृत्यू
टायगर पॉइंट परिसरात रात्री उशिरा मृतदेह सापडला
ड्रोन, श्वान पथक व शिवदुर्ग मित्रांची संयुक्त शोधमोहीम
नवी मुंबईतील बेलापूर येथून लोणावळ्यात ट्रेकिंगसाठी आलेल्या २० वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीचा टायगर पॉइंट येथील दरीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ३१ जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या या विद्यार्थिनीचा मृतदेह रविवारी सायंकाळी शोध मोहिमेदरम्यान आढळून आला. पुणे ग्रामीण पोलिस, शिवदुर्ग मित्र आणि श्वान पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. ड्रोनच्या सहाय्याने मृतदेह शोधून काढण्यात आला. या घटनेमुळे लोणावळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
लोणावळा : नवी मुंबईतील बेलापूर येथून ३१ जानेवारी रोजी लोणावळ्यात ट्रेकिंगसाठी आलेली २० वर्षीय कायद्याची विद्यार्थिनी रविवारी टायगर पॉइंट येथील दरीत मृतावस्थेत आढळून आली. पुणे ग्रामीण पोलिस आणि शिवदुर्ग मित्र, लोणावळा यांच्या पथकाने रविवारी रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक दिनेश तायडे यांनी प्रहार डिजिटल ला दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी सांगितले होते की ती ड्यूक नाक परिसरात ट्रेकिंगला जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. मात्र, त्या रात्री ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ड्यूक नाक परिसरात शोधमोहीम राबवली, मात्र विद्यार्थिनीचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर रविवारी बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, टायगर पॉइंट येथील एका फूड स्टॉलच्या मालकाला विद्यार्थिनीची बॅग सापडली. बॅगेतील ओळखपत्रावरील फोन नंबरच्या आधारे त्यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला. यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ शिवदुर्ग मित्र रेस्क्यू टीम आणि श्वान पथक घटनास्थळी रवाना केले. श्वानाने विद्यार्थिनी जिथून पडली असावी असा अंदाज असलेले ठिकाण दाखवले.
पुणे ग्रामीण एसपी संदीप सिंग गिल यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्यावर लक्ष ठेवत होते. शिवदुर्ग मित्र, लोणावळा येथील सुनील गायकवाड यांनी सांगितले की, दुपारी २.३० वाजता बचाव पथकातील सदस्यांनी घाटात उतरण्यास सुरुवात केली. या मोहिमेदरम्यान पोलिसांचे ड्रोन तसेच पुण्यातून आणलेले ड्रोन तैनात करण्यात आले.
ड्रोनच्या सहाय्याने सायंकाळी ४.४५ च्या सुमारास विद्यार्थिनीचा मृतदेह शोधण्यात आला. त्यानंतर योगेश सुतार आणि अनिल सुतार या शिवदुर्ग मित्रांच्या सदस्यांनी सुमारे ३९० फूट खोल दरीत उतरून मृतदेह स्ट्रेचरवर सुरक्षित केला. रविवारी रात्री ९.३० वाजता अखेर मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.













