रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला ‘बेस्ट बँक ऑफ द इअर’ आणि ‘इनोव्हेटिव्ह बँक ऑफ इअर’ पुरस्काराने गौरव

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवत ‘को-ऑप. बँक्स टॉप १०० समिट २०२५’ अंतर्गत ‘बेस्ट बँक ऑफ द इअर’ आणि ‘इनोव्हेटिव्ह बँक ऑफ इअर’ हे दोन मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. नवी मुंबई येथील मे. इ प्लस इंटेलेक्च्युअल मिडीया यांच्या वतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. खोपोली येथील नोवोटेल हॉटेलमध्ये ३१ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या हस्ते बँकेला हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

बँकेने तंत्रज्ञानाचा अवलंब, डिजिटल बँकिंग सेवा आणि सहकार क्षेत्रातील नावीन्यपूर्ण धोरणांमुळे हे यश संपादन केले आहे. आर्थिक आघाडीवरही बँकेची कामगिरी उल्लेखनीय असून, ३१ मार्च २०२५ अखेर बँकेने ५००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. यामध्ये २८६६.८७ कोटींच्या ठेवी आणि २१९९.६४ कोटींच्या कर्जांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, बँकेला सलग १५ वर्षे ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून, गेल्या १३ वर्षांपासून बँकेचे नक्त एन.पी.ए. (Net NPA) प्रमाण ०% राखण्यात बँक यशस्वी ठरली आहे.

पुरस्कार स्वीकारताना बँकेचे संचालक श्री. एम.एस. टिळेकर, श्री. आर.जी. गराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एस.पी. गिम्हवणेकर, सरव्यवस्थापक श्री. समीर दळवी आणि उपसरव्यवस्थापक श्री. संतोष खेडसकर उपस्थित होते. यावेळी इंडियन बँकिंग असोसिएशनचे डेप्युटी सीईओ श्री. गोपाळ भगत, रिझर्व्ह बँकेचे संचालक मा. सतीश मराठे आणि अन्य मान्यवर देखील उपस्थित होते.

बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बँकेने आजवर एकूण १९ पुरस्कार मिळवले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती आणि तळागाळातील जनतेपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवण्याच्या बँकेच्या या कार्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.