भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा प्रतिसाद 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सातेरी मंगल कार्यालय, रामघाट रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण २० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजोपयोगी कार्यात मोलाचे योगदान दिले.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला चे अध्यक्ष प्रा. डॉ. आनंद बांदेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत, “रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर अंकिता बांदेकर, महेश राऊळ, सायली सुदेश आंगचेकर, खर्डेकर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिलीप शितोळे तसेच संचालक आनंद केरकर व गजानन गोलतकर, आय टी आय संस्थेचे डिसिल्वा सर, विलास ( नाना) राऊळ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे मनापासून कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक जागृती निर्माण होते, असे मत व्यक्त केले.

यावेळी वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगरसेवक प्रणव वायंगणकर आणि आसोली पंचायत समितीचे सदस्य संकेत धुरी यांनी सदर शिबिरास भेट देऊन आयोजकांना व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. जी. पी. धुरी यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच गौरेश वायंगणकर, दिव्या वायंगणकर, सानिया सरमळकर व रक्तदात्यांनी विशेष परिश्रम घेतले.