आडेली भंडारवाडी येथे ओढ्यात असलेली साडेसात फुटांची मगर पकडण्यास वनविभागाला यश

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली भंडारवाडी येथे आज सुमारे साडेसात फूट लांबीची मगर पकडण्यात वनविभागाला यश आले. एका शाळकरी मुलाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे ही मगर पकडणे शक्य झाले. त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास शाळेतून घरी परतणाऱ्या एका मुलाला गावातील ओढ्यात ही मगर दिसली. घाबरून न जाता, त्याने ही माहिती तात्काळ गावकऱ्यांना दिली. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली.

​गावकऱ्यांनी लगेच कुडाळ येथील वनविभागाच्या बचाव पथकाशी संपर्क साधला. माहिती मिळताच पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव मोहीम सुरू केली. अथक प्रयत्नांनंतर अखेर या साडेसात फूट लांब मगरीला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले.

​या बचाव मोहिमेमध्ये वनक्षेत्रपाल अनिल गावडे, दिवाकर बांबार्डेकर, प्रसाद गावडे आणि वैभव अमृसकर यांचा समावेश होता. गावातील सुधीर मुंडये, लऊ दाभोलकर, पिंट्या होडावडेकर, अर्जुन मुंडये, ज्ञानेश्वर मुंडये आदींसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित होते. ​वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, पकडलेल्या या मगरीला लवकरच तिच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे. वनविभागाच्या या यशस्वी कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.