पडवे माजगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

सावंतवाडी : तालुक्यातील पडवे माजगाव येथे खाजगी क्षेत्रात चारायला सोडलेल्या गाईवर वाघाने केलेल्या भीषण हल्ल्यात गाईचा मृत्यू झाला. बाळकृष्ण आपा देसाई यांची ही गाय असून शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. रात्री उशीर झाल्याने रविवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल होणार असून त्यानंतरच हा हल्ला नेमका कोणी केला याची माहिती मिळणार आहे.

पडवे माजगाव परिसरात सद्यस्थितीत वाघाचा वावर असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांकडून देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर शनिवारी बाळकृष्ण देसाई यांच्या गाईवर वाघाने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. देसाई यांनी नेहमीप्रमाणे आपली गाय आपल्या खाजगी क्षेत्रात चरण्यासाठी सोडली होती. संध्याकाळी उशिरापर्यंत गाय परत न आल्याने शोधा शोध केली असता सदरची गाय मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याकडील भाग वाघ सदृश्य जंगली श्वापदाने खाल्ल्याचे दिसून आले. या हल्ल्यात ती गाय जागीच गतप्राण झाली होती.

याबाबतची माहिती शेतकरी बाळकृष्ण देसाई यांनी वनविभागाला दिल्यानंतर स्थानिक वनपाल नागेश खोराटे यांनी तांबोळी वनरक्षक सुयश पाटील यांना घटनास्थळी रवाना केले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला मात्र काळोख पडल्याने पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी जाऊ शकले नाहीत. रविवारी सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल होणार असून त्यांच्या अहवालानंतरच नेमका हा हल्ला कोणत्या प्राण्याने केला याबाबत खात्री होणार आहे.

या भागात वाघाचा वावर असून एवढ्या मोठ्या गाईवर हल्ला हा वाघच करू शकतो अशी माहिती प्राप्त झाली आहे. प्रथमदर्शनी जरी हा हल्ला वाघाने केल्याचे म्हटले जात असले तरीही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतरच याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. गाईवर केलेल्या वाघाच्या या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
बाळकृष्ण देसाई यांची सदरची गाय ही सुमारे ४ ते ५ वर्षांची होती. सदरची गाय गाभण होती अशी माहिती देखील वनविभागाकडून देण्यात आली आहे. गाईच्या आकस्मिक मृत्यूमुळे शेतकरी बाळकृष्ण देसाई हे हवालदिल झाले असून वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच सदरच्या वन्य प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी देखील स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.