पत्नीने घरातून ७० हजारांचा ऐवज नेल्याची पतीची तक्रार

कणकवली : पत्नीने आपल्या व आईच्या संमतीशिवाय घरातील रोख ५५ हजार रुपये आणि १५ हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार जयेंद्र लक्ष्मण चव्हाण (३२, रा. नवीन कुर्ली वसाहत, फोंडाघाट) यांनी कणकवली पोलिसांत दिली आहे. तसेच पत्नीने आपल्यासह आई-वडिलांना शिवीगाळ केल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार संशयित जान्हवी उर्फ राधिका महादेव चव्हाण (सध्या रा. धामोड, ता. राधानगरी) हिच्याविरोधात कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयेंद्र चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, ते गवंडी काम करतात. १९ मे २०२६ रोजी त्यांचा विवाह धामोड, राधानगरी येथील राधिका महादेव चव्हाण हिच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांनी दोघांमध्ये वाद सुरू झाले. गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधी घर साफसफाई करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नीने पुन्हा नांदायला येणार नसल्याचे सांगून भांडण केले आणि ती माहेरी निघून गेली.

त्यानंतर पत्नीने कोणताही संपर्क केला नाही. शुक्रवारी, २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ती काही ओळखीच्या नातेवाईकांना घेऊन नवीन कुर्ली वसाहत, फोंडाघाट येथील घरी आली. घरात आल्यानंतर कोणालाही न विचारता तिने कपडे तसेच कपाटातील घरातील सामान बॅगेत भरले. यावेळी तिने जयेंद्र यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांना शिवीगाळ केली आणि रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कपड्यांची बॅग घेऊन घरातून निघून गेली.

त्यानंतर काही वेळाने जयेंद्र यांच्या आई सुभद्रा यांनी कपाटातील सामान तपासले असता त्यामध्ये ठेवलेली तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि ५५ हजार रुपये रोख रक्कम दिसून आली नाही. सदर अंगठी व रोख रक्कम पत्नी जान्हवी उर्फ राधिका हिने चोरून नेल्याचा संशय व्यक्त करत जयेंद्र चव्हाण यांनी कणकवली पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी जान्हवी उर्फ राधिका महादेव चव्हाण हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.