पोफळीतील बोगद्याला गळती, टप्पा १ व २ बंद
६०० मेगावॅट वीज निर्मिती तात्पुरती ठप्प
कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी येथील बोगद्याला लागलेल्या गळतीमुळे प्रकल्पाच्या वीज निर्मितीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १४९.६२९ दशलक्ष युनिट इतकी वीज निर्मिती कमी झाली आहे. आपत्कालीन बोगदे आणि सर्ज टँकला गळती लागल्याने टप्पा १ आणि २ गेल्या तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याच्या वीज उत्पादनात तब्बल ६०० मेगावॅटची तात्पुरती घट झाली आहे. गळती दुरुस्तीचे काम जलसंपदा विभागाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
चिपळूण : कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी परिसरातील बोगद्याला लागलेल्या गळतीमुळे वीज निर्मितीवर मोठा परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १४९.६२९ दशलक्ष युनिट वीज कमी निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोफळी येथील टप्पा-१ आणि टप्पा-२ च्या आपत्कालीन बोगद्याला तसेच सर्ज टँकला गळती लागली असून, ती दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुरुस्तीमुळे मागील तीन महिन्यांपासून हे दोन टप्पे बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी राज्याच्या एकूण वीज उत्पादनात ६०० मेगावॅटची तात्पुरती घट झाली आहे.
यावर्षी मे महिन्यापासून कोयनेसह महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोयना धरणात सध्या मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र, तरीही मागील आठ महिन्यांत वीज निर्मितीमध्ये मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
वीज निर्मितीची आकडेवारी पाहिली असता, या जलवर्षात पश्चिमेकडे २४.३३ टीएमसी पाण्यावर ११४९.०३३ दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली आहे. गतवर्षी २९.२५ टीएमसी पाण्यावर १३४८.४९१ दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली होती. पश्चिमेकडे ४.९२ टीएमसी पाणी वापर कमी झाल्याने मोठी वीज तूट निर्माण झाली आहे.
सिंचन आणि पूरनियंत्रणासाठी यावर्षी २७.४६ टीएमसी पाण्यावर १३३.८७४ दशलक्ष युनिट वीज निर्मिती करण्यात आली असून, गतवर्षीच्या तुलनेत ४९.८२९ दशलक्ष युनिटची वाढ नोंदवण्यात आली आहे.
चारही जलविद्युत प्रकल्पांचा एकत्रित विचार करता, वीज निर्मिती कमी झाल्यामुळे निर्माण झालेली तूट भविष्यात नियोजनबद्ध पद्धतीने भरून काढावी लागणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कोयना धरणात सध्या मुबलक पाणी साठा असून, राज्यात उन्हाळ्यात विजेची मागणी सर्वाधिक असते. त्या काळात या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करून वीज निर्मिती केल्यास खासगी कंपन्यांकडून महागडी वीज खरेदी करण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती महानिर्मिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
पोफळीतील ईव्हीटी परिसरात जलसंपदा विभागाकडून बोगद्यातील गळती काढण्याचे काम सुरू आहे. जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून काम कधीपर्यंत पूर्ण होईल याचा आढावा घेत आहेत.











