घरे रंगली, आंगणेवाडी सजली ! 

9 फेब्रुवारीला लाखो भाविक घेणार श्री भराडी देवीचे दर्शन  

  दक्षिण कोकणच्या प्रति पंढरपुरात जत्रोत्सवाची लगबग                      

          झुंजार पेडणेकर |आंगणेवाडी : नवसाला पावणाऱ्या आणि हाकेला धावणाऱ्या अशी ख्याती असलेल्या आणि दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर असे मानल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव 9 फेब्रुवारी रोजी होत आहे.अवघ्या चार दिवसानी होणाऱ्या आंगणे कुटुंबियांच्या या वार्षिकोत्सवासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ अहोरात्र मेहनत घेत आहेत. अवघ्या काही दिवसांवर हा जत्रोत्सव आता आल्याने जत्रोत्सवापूर्वीच आंगणेवाडीत व्यापाऱ्यांची लगबग वाढली आहे. हॉटेल व्यावसाईक, मिठाई व्यापारी आंगणेवाडीत दाखल होऊ लागले आहेत. रविवार सुट्टीचा दिवस लागून सोमवारी आंगणेवाडी जत्रोत्सव असल्याने भाविकांची,चाकरमान्यांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी याच दिवशी असल्याने निवडून आलेले अनेक उमेदवार आई भराडीचे आशीर्वाद घेण्यासाठी येणार असल्याने सायंकाळ नंतर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनासाठी आव्हानात्मक होणार आहे.

* *भाविकांना विनाविलंब दर्शनास प्राधान्य ! अध्यक्ष छोटू आंगणे.*

आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारानी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहुन जिवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकाना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकाना केंद्र बिंदु मानुन त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता भाविकाना भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहीती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे, बाबू आंगणे यानी दिली आहे.त्याच प्रमाणे 10 फेब्रुवारी रोजी सुद्धा भाविकांना देवीची ओटी भरणे व दर्शन घेता येणार आहे.

 

* *जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर*

 

आंगणेवाडीत किराणा व्यावसाईक, स्वीट मार्ट, मनोरंजन खेळणी, आकाश पाळणे आदि व्यापाऱ्यानी आपली दुकाने थाटण्यास सुरवात केली आहे. भाविकांच्या दर्शन रांगा, लाकडी उड्डाण पुल, विद्युत रोषणाई, मुख्य सभामंडप आदि ठिकाणचे काम अखेरच्या टप्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने यात्रेतील तात्पुरत्या व्यावसाईकाना वीज कनेक्शन देणे, ओहर हेड वायर अंडर ग्राउंड करणे, ट्रान्सफॉर्मर एकत्र करणे आदि कामे जोरदार चालू आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वच्छता व पाणीशुध्दीकरण कामासाठी कार्यरत आहेत. पोलीस यंत्रणा सुद्धा बंदोबस्त कामात दक्ष झालेली दिसून येत आहे. ग्रामस्थ मंडळा बरोबरच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणे कडून यात्रेकरुंच्या सोई साठी पुरेपुर व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. तसेच दर्शन रांगांच्या मार्गात भाविकांसाठी पीण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

* *रेल्वे कडून 2 जत्रा स्पेशल फेऱ्या -*

कोकण रेल्वे कडुन मुंबई वरुन येणाऱ्या चाकरमान्यांसाठी दोन जादा फेरीचे नियोजन करण्यात आले आहे. सदर रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 8 आणि 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.55 वाजता सुटणार आहे. या जादा गाडीला सिंधुदुर्गातील सर्व स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला 20 डबे स्लीपर असणार आहेत. परतीच्या प्रवासात 7 आणि 9 फेब्रुवारी रोजी मडगाव येथून ही ट्रेन दुपारी 4.30 वाजता मुंबई साठी निघणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी मुंबई येथून सुटणाऱ्या रेल्वेचे आरक्षण आज गुरुवार पासून ऑनलाइन चालू झाले आहे. रेल्वेच्या वेळापत्रका नुसार कणकवली व ओरोस स्टेशन वरुन आंगणेवाडीसाठी जादा एसटीच्या फेऱ्याचे नियोजन एसटी कडुन करण्यात आले आहे.

9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जत्रेसाठी विविध राजकिय पक्षाचे नेते, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. एकूणच जत्रोत्सवासाठी आंगणेवाडी सजु लागली असून केवळ चार दिवसानी लाखो भाविकांचे स्वागत करण्याचे भाग्य समस्त आंगणे कुटुंबियाना श्री देवी भराडी मातेच्या जत्रेच्या निमित्ताने मिळणार आहे.