जिल्हा परिषदसाठी ९ तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात
लांजा -: संतोष कोत्रे
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकी अंतर्गत उद्या शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गट आणि ८ पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत असून, या निवडणुकीत एकूण ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ९ तर पंचायत समिती गणांसाठी २६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
लांजा तालुक्यातील आसगे, भांबेड साटवली आणि गवाणे या चार जिल्हा परिषद गट आणि आसगे, वेरवली बुद्रुक, प्रभानवल्ली, भांबेड, वाकेड, साटवली, गवाणे आणि खानवली या आठ पंचायत समिती गणासाठी निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी नऊ तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील एकूण मतदारसंख्येपैकी ३८ हजार २१६ महिला मतदार असून पुरुष मतदार ३५ हजार ६७५ आहेत. विशेष म्हणजे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे.
निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदानासाठी आज शुक्रवारी सकाळ पासून मतदान केंद्र स्तरीय पथके मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाली. शुक्रवारी सकाळी शहरातील जि.प.शाळा क्र.५ येथे गट व गणांच्या मतदानासाठी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आदी साहित्य घेऊन केंद्र स्तरीय पथके, अधिकारी व कर्मचारी रवाना झाले. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान तर सोमवारी मतमोजणी होणार आहे.
प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीन बंद पडण्यासह काही अडथळे निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथके मतदानाच्या ठिकाणी कार्यरत असणार आहेत.तसेच तालुक्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदानानंतर सर्व मतपेट्या लांजा शहरातील जि.प.शाळा क्र.५ येथे जमा करण्यात येणार असून सोमवारी सकाळी दहा वाजल्या पासून १४ टेबलावर मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.











