गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर सावंतवाडीत ‘सक्षम स्त्री फाउंडेशन’ ची स्थापना

गोशाळेत शुभारंभ ; महिला सक्षमीकरणाचा घेतला संकल्प

​सावंतवाडी । प्रतिनिधी : गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा ध्यास घेऊन सावंतवाडीत ‘सक्षम स्त्री फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आली आहे. पारंपरिक सोहळ्यांना बगल देताना गोसेवेचा संदेश देत एका गोशाळेत अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी वातावरणात या संस्थेचा औपचारिक शुभारंभ झाला. गोपूजन आणि निष्काम समाजसेवेच्या संकल्पाने संस्थेच्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

​भारतीय संस्कृती, सेवा भाव आणि सामाजिक बांधिलकीचे जतन करत गोशाळेतून या उपक्रमाची सुरुवात केल्याबद्दल सर्वच स्तरांतून संस्थेच्या या पुढाकाराचे कौतुक होत आहे. याप्रसंगी उपस्थितांनी महिलांचे स्वावलंबन, शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती आणि समाजहितासाठी निरंतर कार्यरत राहण्याची प्रतिज्ञा घेतली.

​या सोहळ्यात संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
यामध्ये फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सौ. नीलम परिमल नाईक, उपाध्यक्षपदी सौ. मेघा जयराम राणे, खजिनदारपदी सौ. दुलारी दिलेश रांगणेकर, सहखजिनदारपदी सौ. अंकिता प्रतीक बांदेकर आणि सचिवपदी सौ. सुनीता विठ्ठल पेडणेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

​समाजातील प्रत्येक घटकातील महिलेला आत्मनिर्भर, सक्षम आणि सन्मानाने जगता यावे, यासाठी येत्या काळात शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि स्वयंरोजगारास चालना देणारे विविध उपक्रम सातत्याने राबवण्याचा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

गुरूंचा आशीर्वाद, गोसेवेचे पुण्य आणि समाजसेवेचा ध्यास घेऊन सुरू झालेला हा प्रवास महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.