दापोली | प्रतिनिधी:
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात उत्साहात मतदान प्रक्रिया सुरू असताना, दापोली तालुक्यातील टाळसुरे व जालगाव गावात लोकशाहीचा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला.
लग्नाच्या बोहल्यावर उभे राहण्याआधीच दोन नववधूंनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीप्रती असलेली निष्ठा अधोरेखित केली. टाळसुरे येथील वृषाली राजेश चोगले तसेच जालगाव (सुतारकोंड) येथील कांचन शंकर गोवले या नववधूंनी आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवशीही मतदानाचे कर्तव्य सर्वोच्च मानले.
विवाहसोहळ्याची लगबग सुरू असतानाही वेळ काढत त्यांनी थेट मतदान केंद्र गाठले आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आपले मत नोंदवले. जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी बजावलेली ही भूमिका सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.
ही घटना समाजासाठी, विशेषतः तरुण मतदारांसाठी, लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागाचा सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश देणारी ठरली आहे.













